Join us  

टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 3:31 PM

Titanic shipbuilder Harland and Wolff news: येत्या काही दिवसांत कंपनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करणार आहे. कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरलेली कंपनी विकली जाणार नाही, तर तिची पुनर्रचना केली जाते.

टायटॅनिक जहाज बनविणारी १६३ वर्षे जुनी कंपनी दिवाळखोर झाली आहे. हारलँड अँड वोल्फ या कंपनीने स्वत:ला दिवाळखोर घोषित केले आहे. कामकाज करण्यासाठई कंपनीकडे पैसे नसल्याचे म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले जाणार आहे. या कंपनीने १९१२ मध्ये टायटॅनिक जहाज बनविले होते. हे जहाज पहिल्याच प्रवासात हिमनगाला आदळून बुडाले होते. 

येत्या काही दिवसांत कंपनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करणार आहे. कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरलेली कंपनी विकली जाणार नाही, तर तिची पुनर्रचना केली जाते. याची ही प्रक्रिया असणार आहे. यापूर्वी कंपनीने सरकारकडे 26.4 कोटी डॉलर्सची मदत मागितली होती. परंतू सरकारने ही मदत नाकारली. यामुळे कंपनीकडे दिवाळखोरी घोषित करण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

महत्वाचे म्हणजे ही कंपनी ब्रिटीश सरकारला युद्धनौका देखील बनवून देते. तरीही सरकारने मदत करण्यास नकार दिला आहे. कंपनीच्या मुख्य ऑपरेशन्समध्ये बेलफास्ट शिपयार्डचा समावेश आहे, इथेच टायटॅनिकची निर्मिती झाली होती. ही कंपनी यापूर्वीही दिवाळखोरीत गेली होती. २०१९ मध्ये सरकारने तिची पुनर्रचना करत इन्फ्रास्ट्राटला विकली होती. आता ही कंपनी देखील प्रचंड आर्थिक ओझ्याखाली आहे. यानंतर हारलँड अँड वोल्फने तब्बल दोन दशकांनी गेल्या वर्षी पहिले जहाज पाण्यात उतरविले होते. 

या कंपनीचे संचालक रसेल डाउन्स यांनी दिलेल्य माहितीनुसार या कंपनीच्या मालकीच्या ग्रुपची हालत खराब आहे. आम्हाला दीर्घ मुदतीचे कर्ज मिळू शकत नाही. यामुळे कंपनीचे चार यार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काही कठोर निर्णय़ घ्यावे लागले आहेत. 

टॅग्स :इंग्लंड