Lokmat Money > बिझनेस न्यूज > उधारीच्या विमानांसह उभी केली देशातील सर्वात मोठी विमान कंपनी, दोन मित्रांनी रचला IndiGo चा पाया

उधारीच्या विमानांसह उभी केली देशातील सर्वात मोठी विमान कंपनी, दोन मित्रांनी रचला IndiGo चा पाया

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला(Indigo) सध्या अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:47 PM2024-01-17T13:47:15+5:302024-01-17T13:48:30+5:30

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला(Indigo) सध्या अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

The country s largest airline built with borrowed planes Indigo was founded by two friends success story | उधारीच्या विमानांसह उभी केली देशातील सर्वात मोठी विमान कंपनी, दोन मित्रांनी रचला IndiGo चा पाया

उधारीच्या विमानांसह उभी केली देशातील सर्वात मोठी विमान कंपनी, दोन मित्रांनी रचला IndiGo चा पाया

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला(Indigo) सध्या अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्ली विमानतळावर एअरलाइनच्या पायलटला कानशिलात लगावण्यात आली आणि त्यानंतर मुंबई विमानतळावर विमानाच्या शेजारी बसून काही प्रवाशांनी जेवण केल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. मुंबई प्रकरणी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशननं (BCAS) इंडिगोकडून नियमांचं उल्लंघन आणि प्रवाशांना सुविधा न दिल्याबद्दल उत्तरं मागितली आहेत. 

काही दिवसांपूर्वी एका महिला प्रवाशानं इंडिगो फ्लाइटमध्ये दिल्या जाणाऱ्या सँडविचमध्ये किडे असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी FSSAI नं कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. भारतातील विमान सेवा क्षेत्राचा इतिहास अतिशय वाईट राहिला आहे. यात सुब्रत रॉय सहारा, विजय माल्ल्या, नरेश गोयल यांसारख्या अनेकांची नावं सांगता येतील. स्पाइसजेटही अडचणीत असून GoFirst चे कामकाज बंद आहे. इंडिगो या अडचणीतून बाहेर पडू शकेल का? तर एक नजर टाकू इंडिगोच्या आतापर्यंतच्या प्रवासावर...
 


२००६ मध्ये सुरुवात

इंडिगोची सुरुवात २००६ मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी केली होती. आज ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत त्याचा हिस्सा जवळपास ५२ टक्के आहे. राहुल भाटिया हे दिल्लीचा रहिवासी आहेत तर त्यांचा मित्र राकेश गंगवाल हे अमेरिकेत राहतात. गंगवाल यांनी अनेक मोठ्या एअरवेज कंपन्यांमध्ये काम केलं होतं आणि त्यांना या क्षेत्राची चांगली माहिती होती. भाटिया यांनीच गंगवाल यांना विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. अशा प्रकारे, इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन २००४ मध्ये सुरू झाली. त्यावेळी देशातील विमान वाहतूक उद्योग मोठ्या तोट्याचा सामना करत होता. असं असतानाही दोघांनीही या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

उधारीवर घेतली विमानं

२००४ मध्येच त्यांना विमानसेवा सुरू करण्याचा परवाना मिळाला. परंतु कंपनीकडे विमानं नसल्यानं २००६ पर्यंत कंपनी आपली सेवा सुरू करू शकली नाही. गंगवाल यांनी आपल्या ओळखीमुळे कंपनीला एअरबसकडून उधारीवर १०० विमानं मिळवून दिली. शेवटी, कंपनीनं ४ ऑगस्ट २००६ पासून आपली उड्डाणे सुरू केली. इंडिगोनं प्रवास सुरू केला तेव्हा विमान वाहतूक उद्योग कठीण काळातून जात होता. अनेक दिग्गज विमान कंपन्यांमध्ये आपलं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. अशा परिस्थितीत कंपनीनं सर्वप्रथम अशा लोकांना आपला ग्राहक बनवला ज्यांना विमानाने प्रवास करायचा होता परंतु त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळे इंडिगोची अधिकाधिक तिकिटं विकली गेली आणि नगण्य तोटा झाला.
 


कंपनीने देशातील प्रमुख शहरांना हवाई मार्गानं जोडण्याचं काम केलं आणि लोकांना कमी खर्चात हवाई प्रवास देण्याचं स्वप्न पूर्ण केलं. सामान्य लोकांचंही विमानात बसण्याचं स्वप्न यातून पूर्ण झालं. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी विमानानं प्रवास करणं हे केवळ स्वप्न असतं. इंडिगोनं त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. सध्या कंपनीकडे ३४१ विमानं आहेत आणि दररोज १३०० पेक्षा जास्त उड्डाणं चालवतात. इंडिगोमध्ये सुमारे २५००० कर्मचारी आहेत. जगभरातील ६० शहरांमध्ये त्यांची १२६ कार्यालये आहेत. गेल्या वर्षी, इंडिगोनं एअरबसला ५०० विमानांची ऑर्डर दिली होती, ही विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठी ऑर्डर होती. याआधीही कंपनीनं ४८० विमानांची ऑर्डर दिली आहे. अशा प्रकारे, पुढील काही वर्षांत कंपनीला एकूण सुमारे १००० विमानं मिळतील.

मित्रांमध्ये झालेला वाद

२०२० मध्ये राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया यांच्यात वाद झाला होता. गंगवाल यांनी कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. गंगवाल यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. गंगवाल यांचे कुटुंबीय कंपनीतील काही हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत आहेत. गंगवाल आणि त्यांची पत्नी शोभा गंगवाल यांचा इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये अनुक्रमे १३.२३ टक्के आणि २.९९ टक्के हिस्सा आहे. याशिवाय, त्यांच्या ट्रस्ट Chinkerpoo Family Trust ची कंपनीत १३.५ टक्के भागीदारी आहे. इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये राहुल भाटिया यांची ३८ टक्के भागीदारी आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ६.५७ अब्ज डॉलर्स आहे.
 


इंडिगोला मिळालं यश

इंडिगोनं अशा वेळी देशातील विमान वाहतूक क्षेत्रात यश संपादन केलं जेव्हा अनेक मोठ्या कंपन्या अस्तित्वासाठी धडपडत होत्या. विजय माल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाइन्स सुरू केली जी २०१२ मध्ये दिवाळखोर झाली. सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांनीही विमानसेवा क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी एअर सहारा सुरू केली. पण अनेक वर्षे तोट्यात राहिल्यानंतर त्यांनी ते २००७ मध्ये नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजला विकली. २०१९ मध्ये जेट एअरवेजचंही अस्तित्व संपलं. गो फर्स्टची उड्डाणंही सध्या बंद असताना स्पाइसजेटही अडचणीत आली आहे. सरकारी विमान कंपनी एअर इंडिया टाटा समूहाकडे परत गेली आहे. पण आता इंडिगोलाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: The country s largest airline built with borrowed planes Indigo was founded by two friends success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indigoइंडिगो