Valentine's Day 2024: आज व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा केला जात आहे. लोक आज आपल्या जोडीदारांना गुलाब, चॉकलेट आणि अनेक भेटवस्तू देतात. पण आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण गुलाब आणि चॉकलेटपासून थोडा वेगळा विचार करून आर्थिक मुद्द्यांवर बोलू, कारण तुमच्या जीवनातील सर्व गरजा त्यांच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही कपल म्हणून नवीन प्रवास सुरू करत असाल किंवा तुमचा हा प्रवास सुरू झाला असेल, सुरक्षित भविष्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रं असणं आवश्यक आहे. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊ.
जॉईंट बँक अकाऊंट
प्रत्येक जोडप्याचं जॉईंट बँक खाते असणं आवश्यक आहे. जॉईंट अकाऊंटद्वारे, पती-पत्नी दोघेही आवश्यकतेनुसार पैशाशी संबंधित व्यवहार सहजपणे करू शकतात. या खात्याच्या अटी व शर्ती दोघांनाही स्पष्ट असाव्यात.
मॅरेज सर्टिफिकेट
अनेकांजण लग्न झाल्यानंतरही वर्षानुवर्ष मॅरेज सर्टिफिकेट बनवत नाहीत, पण ते एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. प्रत्येक विवाहित जोडप्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा विवाह कायदेशीररित्या वैध होतो. जॉईंट अकाऊंट, जॉईंट लोन, पासपोर्ट, ट्रॅव्हल व्हिसा किंवा कोणत्याही कायमस्वरूपी निवासासाठी अर्ज करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे.
लाईफ इन्शुरन्स पॉलिसी
एक जोडपे म्हणून तुम्ही हे देखील समजून घेतले पाहिजे की भविष्यात कोणतीही अनपेक्षित घटना घडली तर तुमच्या जोडीदाराला मदत कशी मिळेल. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने जीवन विमा पॉलिसी घेणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या जोडीदाराला कठीण काळात आर्थिक सुरक्षा मिळेल.
मृत्युपत्र
तुम्ही हयात नसल्यास तुमच्या मालमत्तेचा वारसा कोणाला मिळेल हे मृत्यूपत्रावरून स्पष्ट होऊ शकतं. प्रत्येक जोडप्यानं याचा विचार केला पाहिजे. मृत्युपत्राद्वारे, जोडपं हे सुनिश्चित करू शकतात की त्यांच्या इच्छेचा आदर केला जाईल आणि त्यांची प्रिय व्यक्ती हयात नसल्यास त्यांची काळजी घेतली जाईल.
प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स
जर पती-पत्नीने मिळून मालमत्ता खरेदी केली असेल तर दोघांनीही ही कागदपत्रे जपून ठेवावीत. या कागदपत्रांमध्ये खरेदी करार, टायटल डीड, कर्जाची कागदपत्रे आणि नोंदणी प्रमाणपत्रं यांचा समावेश आहे. मालमत्ता हस्तांतरण, कर्ज आणि इतर अनेक कायदेशीर बाबींमध्ये ही कागदपत्रे आवश्यक असतात.