Join us  

Byju's वरील संकट संपता संपेना, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मिळाली नाही जुलै महिन्याची सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 11:41 AM

बायजूस ब्रँडची मालकी असलेल्या थिंक अँड लर्न या एज्युटेक कंपनीनं कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचं वेतन दिलेलं नाही.

बायजूस ब्रँडची मालकी असलेल्या थिंक अँड लर्न या एज्युटेक कंपनीनं कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचं वेतन दिलेलं नाही. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीएलएटीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे कंपनी आपल्या खात्यांचा वापर करण्यास असमर्थ ठरत आहे. 

राष्ट्रीय कंपनी कायदा अपील लवादाने (एनसीएलएटी) २ ऑगस्ट रोजी बायजू यांच्या बीसीसीआयकडे असलेल्या १५८.९ कोटी रुपयांच्या थकित तडजोडीला मंजुरी दिली. त्याचबरोबर बायजू यांच्यावरील दिवाळखोरीची कारवाई थांबविण्यात आली होती. मात्र, अमेरिकेतील कर्जदार ग्लास ट्रस्ट कंपनी एलएलसीच्या याचिकेच्या आधारे सर्वोच्च न्यायालयानं १४ ऑगस्ट रोजी अपिलीय न्यायाधिकरणाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

कायदेशीर अडथळ्यांमुळे कंपनीचा पुनरुज्जीवनाचा प्रवास लांबला आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेलं नकारात्मक व्यवसाय चक्र उलटविण्यास कंपनी तयार असल्याचा दावाही बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलद्वारे केला आहे.

काय आहे बायजूस-बीसीसीआय प्रकरण?

बायजूसनं २०१९ मध्ये बीसीसीआयसोबत टीमच्या प्रायोजकत्वाचा करार केला होता. कंपनीने २०२२ च्या मध्यापर्यंत आपली देणी पूर्ण केली होती, परंतु नंतर १५८.९ कोटी रुपयांची देयके थकविली होती. दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बायजूसनं बीसीसीआयशी करार केला. या आधारावर एनसीएलएटीनं बायजूला कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेतून वगळलं आणि प्रवर्तकांना पुन्हा संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली आणलं.

यापूर्वी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) बंगळुरू खंडपीठानं बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्नविरोधात दिवाळखोरीची कारवाई १६ जुलै रोजी सुरू करण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन वर्षांपासून बायजू मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे कंपनीला अनेक संकटांचा सामना करावा लागतोय.

टॅग्स :व्यवसायबीसीसीआय