Join us  

घरांचे स्वप्न महागले! ५० टक्क्यांपर्यंत वाढ; दिल्ली, मुंबईमध्ये ऑफर्स आणि सवलतींचा उतारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 11:22 AM

एमएमआर परिसरात घरांच्या किमती सरासरी ४८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाहा काय आहे यामागचं कारण?

देशातील दोन प्रमुख शहरी क्षेत्र दिल्ली एनसीआर आणि मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील (एमएमआर) मागील पाच वर्षांत घरांच्या किमती तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढल्या. रिअल इस्टेट कंपनी ॲनारॉकने रविवारी जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली. 

विक्रमी विक्री झाल्याने पडून असलेल्या घरांची संख्या वेगाने कमी झाली आहे. ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांमध्ये घरांच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने २०१९ पहिल्या सहा महिन्यांपासून २०२४ चे पहिले सहा महिने या कालखंडातील आहे. या काळात घरांच्या किमती प्रति चौरस फूट ४,५६५ रुपयांपासून वाढून ६,८०० रुपयांपर्यंत पोहोचल्या. 

एमएमआर परिसरात घरांच्या किमती सरासरी ४८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये १०,६१० रुपये प्रति चौरस फूट या किमतीत मिळणाऱ्या घराची किंमत २०२४ च्या पहिल्या तिमाहीत १५,६५० रुपयांपर्यंत वाढली. 

पुरवठ्यात झाली घट 

दिल्ली एनसीआरमध्ये विक्रीविना पडून असलेल्या घरांची संख्या ५२ टक्क्यांनी कमी झाली. २०१९ मध्ये  न विकलेल्या घरांची संख्या १.८२ लाख इतकी होती. २०२४ ही संख्या घटून ८६,९०० वर आली. एमएमआर परिसरात तयार घरांची संख्या २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांत १.९५ लाख इतकी होती. मागील पाच वर्षांत यात १३ टक्क्यांनी घट झाली आहे.

कोविडनंतर घरांना मागणी वाढली

  • घरे बांधण्यासाठी येणारा खर्च वाढला असला तरी या काळात दिल्ली एनसीआर आणि मुंबई एमएमआर परिसरात निवासी घरांच्या किमती वाढल्या आहेत.
  • २०१६ ते २०१९ या काळात एनसीआर, तसेच एमएमआरमध्ये जागांच्या किमतीमध्ये फारसा बदल झाला नाही. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला लाभ झाल्याचे दिसले. 
  • यानंतर कोरोना साथीचा कालखंड सुरू झाला. साथीनंतर घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे बिल्डरांनी विविध ऑफर्स आणि सवलतींची घोषणा केली. 
  • परंतु मागणी वाढल्याने घरांच्या किमतीही वाढवण्यात आल्या. त्यामुळेच या काळात दोन्ही शहरांमधील विक्रीविना पडून असलेल्या घरांचे प्रमाण झपाट्याने घटले. दिल्लीत हे प्रमाण अधिक होते.
टॅग्स :सुंदर गृहनियोजनमुंबईदिल्ली