Join us

आर्थिक वर्षाचा शेवट खडतर राहण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 6:58 AM

आजपासून सुरू होणारा सप्ताह हा दोन सुट्यांसह असणार आहे.

- प्रसाद गो. जोशी

चालू आर्थिक वर्षातील शेवटचा सप्ताह बाजारासाठी खडतर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जपून पावले टाकायला हवीत. अमेरिकेने व्याजदरांमध्ये कपातीचे संकेत दिले असले तरी परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या विक्रीने आगामी वाटचालीचा सूचक इशारा दिला आहे. 

आजपासून सुरू होणारा सप्ताह हा दोन सुट्यांसह असणार आहे. त्यातच ‘एफ ॲण्ड ओ’ ची सौदापूर्ती असल्यामुळे बाजारावर विक्रीचे दडपण येऊ शकते. परकीय वित्तसंस्थांही वर्षअखेरीमुळे खरेदी-विक्री यापैकी कोणता निर्णय घेतात याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील जीडीपीची आकडेवारी आणि खनिज तेलाचे मूल्य याकडे बघून आगामी सप्ताहात बाजारात वध-घट होण्याची शक्यता आहे. 

गेल्या दोन सप्ताहांमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या समभागांमध्ये बरीच घसरण झाल्यामुळे बरेच समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध असून त्यापैकी निवडक खरेदी करण्याचा विचार हा लाभदायक ठरू शकतो. मात्र, या समभागांची खरेदी करताना ते वेगवेगळ्या क्षेत्रांमधील असल्याची खात्री करावी. अन्यथा त्यामधून धोका संभवतो.

गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी मोठी विक्री केल्याने बाजाराखाली आला होता. मात्र, उत्तरार्धात देशांतर्गत वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीचा जोर लावल्याने बाजार वधारला. सप्ताहाच्या अखेरीस सर्व महत्त्वाच्या निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसली.

परकीय संस्थांची समभाग विक्रीअर्थव्यवस्थेची वाटचाल चांगली चालली असली तरी गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी शेअरची विक्री तर बॉण्ड्सची खरेदी केली. गतसप्ताहात या संस्थांनी ३१.४ कोटी रुपयांचे समभाग विकले. मात्र, मार्च महिन्याचा विचार केला, तर या संस्थांनी ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत परकीय वित्तसंस्थांनी रोख्यांमध्ये १३,२२३ कोटी गुंतविले आहेत. यावरून परकीय वित्तसंस्था समभागांपेक्षा रोख्यांवर अधिक लक्ष देत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :शेअर बाजार