नवी दिल्ली : ॲप आधारित फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी खाद्यपदार्थ वितरणाचे (डिलिव्हरी) काम करणाऱ्या कामगारांना शहरातील अन्य कामगारांच्या तुलनेत जास्त तास काम करूनही कमी वेतन मिळत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण’ (पीएलएफएस) अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, फूड डिलिव्हरी कामगार एका आठवड्यात सरासरी ६९.३ तास काम करतात. याउलट शहरातील कामगार सरासरी ५६ तासच काम करतात.
याचाच अर्थ फूड डिलिव्हरी कामगारांवरील कामाचा बोजा २३ टक्के जास्त आहे. सर्वेक्षणानुसार, २०१९ मध्ये फूड डिलिव्हरी कामगारांचा प्रभावी मासिक मोबदला १३,४७१ रुपये होता, इंधनदर वाढल्यामुळे तो मे २०२२ मध्ये घसरून ११,९६३ रुपये झाला. मासिक वेतनही ८ टक्के घसरून २२,४९४ रुपयांवरून २०,७७४ रुपये झाले.
पगारी रजाही नाहीत
फूड डिलिव्हरी कामगारांना अपघाती विम्याचे संरक्षण असले तरी आरोग्य विम्यापासून ते वंचित आहेत. अन्य एकतृतीयांश कामगारांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा योजनेचे संरक्षण असते. फूड डिलिव्हरी कामगारांना पगारी रजाही नसतात.