Join us  

सरकार झाले आणखी श्रीमंत; सप्टेंबर महिन्यात १.६३ लाख कोटींचे जीएसटी संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 7:37 AM

१०.२ टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारला जीएसटी करातून सप्टेंबर महिन्यात १.६३ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०२२ मध्ये सप्टेंबरमध्ये १.४७ लाख कोटी इतका महसूल मिळाला होता. यंदा यात १०.२ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

सरकारने जीएसटीमधून ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी, तर जुलैमध्ये १.६५ लाख कोटींची कमाई केली होती. सप्टेंबरमध्ये लागोपाठ सातव्या महिन्यात जीएसटीतून १.५ लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न सरकारला मिळाले आहे.

आजवरचे सर्वाधिक १.८७ लाख कोटी इतके जीएसटी संकलन एप्रिल २०२३ मध्ये झाले होते. तसेच सलग १९ महिने जीएसटीतून १.४ लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.

चालू आर्थिक वर्षात ९.९३ लाख कोटींची कमाई

२०२३-२४ या आर्थिक वर्षात मागील पाच महिन्यांमध्ये ९.९३ लाखांचे जीएसटी संकलन झाले आहे. २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षात १८.१० लाख कोटींचे जीएसटी संकलन झाले होते.

२०१७ मध्ये लागू

जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कर आहे. व्हॅट, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज ड्टुटी, अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर हटवून त्या जागी जीएसटी कर लागू केला होता. यात ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे करांचे चार स्तर आहेत.

राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या जीएसटी संकलनाचा विचार केला, तर सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. २५,१३७ कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनासह महाराष्ट्रात मागील वर्षाच्या तुलनेत १७ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

११,६९३ कोटी रुपये मिळविणारे कर्नाटक दुसऱ्या, तर १०,४८१ कोटी इतक्या संकलनासह तामिळनाडू तिसऱ्या स्थानी आहे. बिहारमध्ये मात्र जीएसटी संकलन मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घटले आहे. इतर राज्यांमधून समाधानकारक संकलन झाले आहे.

सीजीएसटीतून २९,८१८ कोटी

आर्थिक मंत्रालयाने सांगितले की, ऑगस्ट २०२३ मध्ये जीएसटी संकलन १,६२,७१२ कोटी रुपये इतके होते.

आसीजीएसटीतून २९,८१८ कोटी मिळाले, तर एसजीएसटीतून ३७,६५७ कोटी मिळाले.