तुम्ही रस्त्यावरून येता जाता किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेकदा अनेकांना गुटखा खाऊन थुंकताना पाहिलं असेल. अनेकदा असं न करण्यासाठी तुम्ही त्यांना टोकलंही असेल. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणं ही बाब अत्यंत चुकीची असली तरी ही आता सरकारसाठीही डोकेदुखीच ठरतेय. भारतातील पान मसाला बाजार सुमारे ४५,००० कोटी रुपयांचा आहे. सरकारला यातून २५ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल मिळत नाही. हिशोब केला तर ही रक्कम सुमारे १२,००० कोटी रुपये येते. तर दुसरीकडे गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी रेल्वे ही रक्कम खर्च करते. म्हणजेच यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सरकारकडे काहीही उरत नाही. याचा शरीरालाही काही फायदा होत नाही, उलट जास्त नुकसानच होतं. अशा परिस्थितीत गुटख्यावर बंदी का घातली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लेखक मनोज अरोरा यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली आहे. गुटख्यातून मिळणारं उत्पन्न आणि त्यातून होणाऱ्या खर्चाची आकडेवारी मांडताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. त्याच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
"भारतातील पान मसाला बाजार सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा आहे. सरकारला २५ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल मिळत नाही. म्हणजे सुमारे १२ हजार कोटी रुपये. हा सगळा पैसा गुटख्याचे डाग साफ करण्यात वाया जातो. आरोग्यावर कोणताही जरी दिसला नाही, तरी गुटख्यावर बंदी का घालू नये?" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
कुठून आली आकडेवारी?
खरं तर, २०२१ मध्ये खुद्द भारतीय रेल्वेनंच सांगितलं होतं की ते दरवर्षी गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी १२००० कोटी रुपयांचा खर्च करतात. या समस्येवर मात करण्यासाठी रेल्वेनं ४२ स्थानकांवर थुंकण्यासाठी विशेष किऑस्क उभारण्याची योजना जाहीर केली होती. या किऑस्कमध्ये ५ ते १० रुपयांत थुंकण्याच्या पाऊच मिळणार असून, त्यामुळे स्वच्छतेचा खर्च कमी होणार आहे.
गुटखा बाजार मोठा
गुटखा उद्योगाचा नेमका आकार सांगणं अवघड आहे. मात्र, आयएमएआरसीच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारतात त्याचा आकार सुमारे ४४,९७३ कोटी रुपये होता. तर २०३२ पर्यंत देशातील गुटखा बाजाराचा आकार सुमारे ६२ हजार ६७ कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.