सोनं हा एक मौल्यवान धातू आहे. याचे मूल्य काळानुसार वाढतच आहे. भारतात सणासुदीला सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक लोक दागिन्यांपासून ते नाण्यांपर्यंत सोन्याची खरेदी करत असतात. मात्र, सोने घरात ठेवण्यासाठी काही सरकारी नियमांचे पालनही करावे लागते. तसेच, एका मर्यादेपेक्षा अधिक सोने घरात ठेवता येत नाही. तर जाणून घेऊया घरात सोने ठेवण्यासंदर्भातील काही सरकारी नियमांबद्दल...
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानुसार (CBDT), जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या इनकमचा खुलासा केला असेल, कृषी उत्पन्नाप्रमाणे सूट असलेले उत्पन्न, वाजवी घरगुती बचत अथवा कायदेशीरपणे वारसा हक्काने मिळालेल्या उत्पन्नातून सोन्याची खरेदी केली असेल तर ते टॅक्सअंतर्गत येत नाही. महत्वाचे म्हणजे, नियमानुसार, शोध मोहिमेदरम्यान, अधिकारी घरातून सोन्याचे दागिने जप्त करू शकत नाहीत, मात्र ते निश्चित केलेल्या प्रमाणत असावे.
एवढं सोनं ठेऊ शकता -
तसेच, सरकारी नियमांप्रमाणे एका विवाहित महिलेस 500 ग्रॅम सोने ठेवता येऊ शकते. तसेच एका अविवाहित महिलेस 250 ग्रॅम सोनेच ठेवता येऊ शकते. तसेच कुटुंबातील पुरुषांसाठी ही मर्याता 100 ग्रॅम एवढी आहे. नियमांनुसार, 'याशिवाय कितीही दागिने कायदेशीरपणे ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे. अर्थात उत्पन्नाचा स्त्रोत स्पष्ट असेल तर कितीही सोने खरेदी करता येऊ शकते.
टॅक्स -
तसेच, जर एखाद्या व्यक्तीने तीन वर्षांहून अधिक काळ सोने ठेऊन, नंतर विकल्यास विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नावर लॉन्ग-टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) लागतो. जो इंडेक्सेशन बेनिफिटसह 20 टक्के एवढा आहे. तसेच आपण सोने खरेदी केल्यानंतर तीन वर्षांच्या आतच विकले, तर ते संबंधित व्यक्तीच्या उत्पन्नातच जोडले जाते आणि लागू असलेल्या टॅक्स स्लॅबनुसारच कर लावला जातो.