नवी दिल्ली : भांडवली लाभ कराच्या (कॅपिटल गेन टॅक्स) नियमांत बदल करण्याची तयारी केंद्र सरकारने चालवली आहे. त्यामुळे ज्यांना शेअर बाजारातून नफा मिळतो, त्यांना अधिक कर द्यावा लागण्याची शक्यता आहे.
अर्थ मंत्रालयाच्या समोर असलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, शेअर बाजारातून मिळणारे उत्पन्न हे ‘पॅसिव्ह इन्कम’च असते. त्यामुळे त्यावर लागणारा कर व्यावसायिक उत्पन्नावरील करापेक्षा कमी असता कामा नये. व्यावसायिक उत्पन्नात अनेक जोखिमा असतात. त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतात.
शिवाय सरकार काही नवीन कल्याणकारी योजनांचा विचार करीत आहे. त्यासाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्याची गरज आहे.भांडवली लाभ करात बदल करण्यासाठी सरकारला कायद्यात बदल करावा लागेल. त्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वाधिक उपयुक्त वेळ आहे. तोपर्यंत वित्त मंत्रालय यावर गांभीर्याने विचारही करेल.
दोन प्रकारचा असतो भांडवली लाभ कर
भांडवली लाभ कर दोन प्रकारचा असतो. पहिल्यास दीर्घकालीन भांडवली लाभ कर तर दुसऱ्यास अल्पकालीन भांडवली लाभ कर
असे म्हणतात.
१०% भांडवली लाभ कर
एक वर्षापेक्षा अधिक काळ गुंतवणूक केलेल्या सूचीबद्ध कंपन्यांच्या समभागावर एक लाख रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळाल्यास लागतो.
१५% कर
एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या गुंतवणुकीवर लागतो. हे नियम एप्रिल २०१९ पासून लागू आहेत.