प्रसाद गो. जोशी
शेअर बाजारामध्ये विक्रम संवत २०८० ची सुरुवात चांगल्या वाढीने झाल्यावर सलग तिसऱ्या सप्ताहामध्ये बाजाराचे निर्देशांक हिरव्या रंगामध्ये बंद झाले आहेत. बँका आणि वित्तीय संस्थांच्या समभागांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. आगामी सप्ताहात काही विशेष घडामोडी नसल्यामुळे खनिज तेलाच्या किमती आणि परकीय वित्त संस्थांची कामगिरी यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे.
रविवारी मुहूर्ताच्या सौद्यांना बाजारामध्ये मोठी तेजी बघावयास मिळाली. सप्ताहामध्येही बाजार वाढत गेला. मुंबईशेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ८९०.०५ अंशांनी वाढून ६५,७९४.७३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९७३१.८० अंशांवर बंद झाला. त्यामध्ये ३०६.४५ अंशांची वाढ झाली आहे. मिडकॅपमध्ये ८१४.४५ अंशांची वाढ झाली. स्मॉलकॅपमध्ये १२१९.८७ अंशांची वाढ झाली असून हा निर्देशांक ३९,५९८.६३ अंशांवर पोहोचला आहे.
आगामी सप्ताहामध्ये देशांत कोणतीही महत्त्वाची आकडेवारी जाहीर व्हावयाची नाही. मात्र, अमेरिकेतील व्याजदराबाबत निर्णयाची शक्यता आहे. तसेच, जपानमधील चलनवाढ व अन्य काही आकडेवारी बाजाराला दिशा देऊ शकते. अमेरिकेतील काहीसे कमी झालेले व्याजदर हे परकीय वित्तसंस्थांना भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. मात्र, अद्याप या संस्थांनी वेट ॲण्ड वाॅचची भूमिका घेतली आहे.
परकीय वित्तसंस्थांनी
गुंतविले १,४३३ कोटी रुपये
nअमेरिकेतील बॉण्डच्या व्याजदरामध्ये काही प्रमाणात झालेली घट व कमी झालेल्या तेलाच्या किमती, यामुळे परकीय वित्तसंस्था पुन्हा भारतामध्ये खरेदीसाठी सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत.
nअडीच महिने सातत्याने विक्रीचा धडाका लावलेल्या संस्थांनी गत सप्ताहात मोठी खरेदी केली. त्याचबरोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये या संस्थांनी भारतीय बाजारात १,४३३ कोटी रुपयांची खरेदी केल्याचेही दिसून आले.