लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नव्या आर्थिक वर्षात शेअर बाजार नवनवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. हिंदू परंपरेनुसार नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी गुढीपाडव्याला शेअरबाजाराने ७५ हजारांचा टप्पा पार केला. या दिवशी सेन्सेक्सने आजवरचा सार्वकालिक ७५,१२४ अंकांचा उच्चांक सर केला तर निफ्टीही २२,७६८ अंकांपर्यंत उसळला होता. यानंतर झालेल्या ५८ अंकांच्या किरकोळ घसरणीनंतर सेन्सेक्स ७४,६८३ अंकांवर स्थिरावला तर २४ अंक घसरून निफ्टी २२,६४२ अंकांवर स्थिर झाला.
सेन्सेक्सच्या ३० शेअरमधील १९ समभागांमध्ये वृद्धी दिसली तर ११ समभाग घसरले. अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्समध्ये ३.१३ टक्के वाढ झाली. सोमवारी ८ एप्रिल रोजीही शेअर बाजाराने सार्वकालिक उच्चांक गाठत ७४,८६९ अंकांचा टप्पा सर केला होता तर निफ्टीही २२,६९७ अंकापर्यंत उसळला होता.
तेजीमागची कारणे काय?
nनिवडणुकीनंतर देशात भाजपचे सरकार येणार अशी आशा बाजारात आहे. यामुळे बाजारात वातावरण सकारात्मक आहे.
nशेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूदारांनी मागच्या सत्रात १,६५८ कोटींची गुंतवणूक केली. जूनमध्ये अमेरिका व्याजदरात मोठी कपात करील अशी बाजाराला अपेक्षा आहे.
अमेरिकन बाजारातून काहीसे कमजोरीचे संकेत मिळत असतानाही भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते.