मुंबई : अमेरिकन संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या सनसनाटी अहवालाने अदानी समूहाला जबर हादरा बसला असून, तीन आठवड्यांत कंपन्यांच्या समभागांमध्ये प्रचंड घसरण होत आहे. अदानी समूहाचे १३५ अब्ज डॉलरपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक श्रीमंतांत तिसऱ्या स्थानावर पोहोचलेले गौतम अदानी सध्या २५ व्या स्थानावर खाली आले आहेत.
२४ जानेवारी रोजी अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांनी त्यांचे तीन चतुर्थांश मूल्य गमावले आहे. अहवाल येण्यापूर्वी अदानी समूहाचे समभाग सर्वांत वेगाने वाढणारे समभाग होते. अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तब्बल ८५ टक्क्यांनी कोसळणार, ही हिंडेनबर्गच्या अहवालातील बाब आता खरी होत असून, कंपन्यांचे समभाग ८० टक्क्यांपर्यंत खाली आले आले आहेत.
बांगलादेश विद्युत मंडळाने अदानी समूहाकडून वीज खरेदी करण्याच्या करारावर पुनर्विचार करण्यासाठी सरकारला पत्र लिहिले आहे.
सर्वाधिक घसरण
हिंडेनबर्ग अहवालाने अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीवरही गंभीर परिणाम झाला आहे. कारण, वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती ७१ अब्ज डॉलरपेक्षा कमी झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश इंडेक्समध्ये सूचीबद्ध ५०० श्रीमंत लोकांमध्ये अदानी यांच्या संपत्तीची सर्वांत वेगाने घसरण झाल्याचे पाहायला मिळते.
बँक ऑफ बडोदा आणखी कर्ज देणार
बँक ऑफ बडोदाचे सीईओ संजीव चढ्ढा यांनी म्हटले की, त्यांची बँक अडचणीत असलेल्या अदानी समूहाला आणखी कर्ज देण्यास तयार आहे. चढ्ढा म्हणाले की, बँक ऑफ बडोदा अदानी समूह आणि त्यांच्या प्रकल्पाला झोपडपट्टीचे री-मॉडेल तसेच उर्वरित प्रकल्पांसाठी अतिरिक्त कर्ज देण्यास तयार आहे. बँकेला अदानी समूहातील अस्थिरतेबाबत कोणतीही चिंता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.