लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९१ मध्ये उदारीकरणाचे धोरण स्वीकारले होते. यानंतर म्हणजे ३० वर्षांनंतर प्रथमच देशातील सर्वांत गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात तब्बल ५३ टक्क्यांची घट झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर २०१५ ते २०२१ या काळात मात्र श्रीमंतांच्या उत्पन्नात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या सर्वेक्षणानुसार, सर्वांत गरीब २० टक्के कुटुंबांचे उत्पन्न १९९१ नंतर सतत वाढत होते. मात्र, कोरोना महामारीच्या २०२०-२१ या वर्षात प्रथमच त्यांच्या उत्पन्नात घट झाली. . २०१५-१६ च्या तुलनेत महामारीमध्ये उत्पन्नात ५३ टक्के घट झाली. म्हणजेच पाच वर्षांत उत्पन्न निम्म्यावर आले आहे.हे सर्वेक्षण मुंबईस्थित पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमीने एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान केले. १०० जिल्ह्यांतील १२० शहरे आणि ८०० गावांमध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कशी वाढत गेली, याचा यामध्ये अभ्यास करण्यात आला.सर्वेक्षणात २ लाख ४२ हजार कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणात फक्त गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात घटच नाही झाली, तर गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी आणखी रुंदावत असल्याचे दिसून आले. अभ्यासानुसार, पाच वर्षांच्या कालावधीत सर्वांत श्रीमंत २० टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२००५ ते २०१६ ठरले फायद्याचेयापूर्वी २००५ ते २०१६ या काळात या कुटुंबांच्या उत्पन्नात १८३ टक्क्यांनी वाढ झाली होती. या काळात त्यांच्या उत्पन्नात दरवर्षी ९.९ टक्क्यांनी वाढ झाली होती.
शहरातील लोकांना मोठा फटकाया सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, साथीच्या रोगाचा सर्वांत मोठा परिणाम शहरी गरीब कुटुंबांवर झाला आहे. २०१५-१६ मध्ये या सर्वांत गरीब २० टक्के कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १,३७,००० रुपये होते; परंतु २०२०-२१ मध्ये ते ६५,००० रुपयांवर घसरले.