Join us

'या' सरकारी बँकेला इन्कम टॅक्स विभागनं ठोठावला ५६४ कोटींचा दंड, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:42 PM

आयकर विभागानं या सरकारी बँकेला ५६४.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. जाणून घ्या काय म्हटलंय बँकेनं.

आयकर विभागानं सार्वजनिक क्षेत्रातील बँक, बँक ऑफ इंडियावर (Bank of India) मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागानं बँक ऑफ इंडियाला ५६४.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. आपण आयकर आयुक्त, नॅशनल फेसलेस अपील सेंटर (NFAC) यांच्यासमोर या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती बँक ऑफ इंडियानं दिली. 

का ठोठावण्यात आला दंड? 

बँकेवर अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. बँकेनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत “त्यांना आयकर विभागाकडून, २०१८-१९ या मूल्यांकन वर्षाशी संबंधित आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम २७०ए अंतर्गत आदेश मिळाला आहे. यामध्ये निरनिराळ्या नियमांतर्गत ५६४.४४ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे,” असं म्हटलं आहे. 

 

बँकेनं काय म्हटलंय? 

या प्रकरणात आपल्याकडे कायदेशीर आधार आहे आणि निर्धारित कालावधीच्या आत दंड कमी करण्यासाठी नॅशनल फेसलिफ्ट अपीलेट सेंटरमध्ये जाण्याची तयारी केली जात असल्याचं बँकेनं म्हटलं. दरम्यान, दंडाची मागणी कमी केली जाईल. अशातच बँकेची आर्थिक स्थिती, कामकाज आणि अन्य कोणत्याही बाबींवर परिणाम होणार नसल्याचंही बँकेनं स्पष्ट केलंय.

टॅग्स :इन्कम टॅक्सबँक ऑफ इंडिया