प्रसाद गो. जोशी|
जीडीपीची आकडेवारी आणि एफ ॲण्ड ओ व्यवहारची सौदापूर्ती याकडे बाजाराचे लक्ष राहणार असून जागतिक बाजारांमधील वातावरणाचा भारतातील शेअर बाजारावर परिणाम होणार आहे. अमेरिका पुढील महिन्यात व्याजदर कपात करण्याचे मिळालेले संकेत हे बाजाराला बळ देऊ शकतात. एफ ॲण्ड ओच्या सौदापूर्तीमुळे काही काळ बाजार अस्थिर रहण्याची शक्यता असली तरी एकूणच बाजार तेजीचे संकेत दाखवत आहे.
गतसप्ताहामध्ये बाजाराने चांगली वाढ दाखविली आहे. सेन्सेक्समध्ये ६४९.३७ अंशांनी वाढ होऊन तो ८१,०८६.२१ अंशांवर पोहोचला आहे. निफ्टीमध्ये २८२ अंश तर मिडकॅपमध्ये ९२७.९९ अंशांनी वाढ झाली आहे. स्माॅलकॅपला गुंतवणूकदारांची पसंती लाभत असल्यामुळे हा निर्देशांक१८२४.८० अंशांनी उसळून ५५ हजारांचा टप्पा पार करून गेला आहे. या सप्ताहात मिडकॅपमध्ये तेजी येण्याची शक्यता दिसते आहे.
१ लाख काेटींची रोख्यांमध्ये गुंतवणूक
परकीय वित्तसंस्था भारतीय रोख्यांमध्ये चांगली गुंतवणूक करीत आहेत. ऑगस्ट महिन्यात या संस्थांनी रोख्यांमध्ये ११, ३६६ कोटी रुपये टाकले. वर्ष २०२४मध्ये या संस्थांनी रोख्यांमध्ये १.०२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.