भारतीय वंशाचे अजय बंगा (Ajay banga) हे जागतिक बँकेचे (World Bank) पुढील अध्यक्ष होऊ शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी, २३ फेब्रुवारी रोजी सांगितले की, अमेरिकेने जागतिक बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांचे पूर्ण नाव अजयपाल सिंग बंगा आहे. अजय बंगा हे सध्या जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष आहेत, जे जगातील सर्वात मोठ्या खाजगी इक्विटी फर्मपैकी एक आहे. याआधी ते दिग्गज क्रेडिट कार्ड कंपनी मास्टरकार्डचे कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ होते.
बंगा यांना हवामान बदलासह जगातील अनेक महत्त्वाच्या आव्हानांचा भरपूर अनुभव आहे, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांचे नाव सुचविण्याचा निर्णय घेतला असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. जागतिक बँकेचे भारतासह १८९ सदस्य देश आहेत. त्याचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास आहेत. त्यांची नियुक्ती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात केली होती. येत्या जूनमध्ये आपण मुदतीपूर्वीच पद सोडणार असल्याचे मालपास यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. साधारणपणे, मालपास यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ एप्रिल २०२४ मध्ये पूर्ण होणार होता.
३० वर्षांचा अनुभवअजय बंगा यांना सुमारे ३० वर्षांचा व्यवसायाचा अनुभव आहे. मास्टरकार्डमध्ये विविध भूमिका बजावण्याव्यतिरिक्त, त्यांनी अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंकच्या बोर्डवर देखील काम केले आहे. अजय बंगा हे जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन मिळालेले पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.
६४ वर्षीय बंगा यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथील सैनी शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल होते, ते तेव्हा पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते. त्यांचे कुटुंब मूळचे जालंधर, पंजाबमधील आहे. अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. भारत सरकारने २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.