लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत असून, त्याचाच भाग म्हणून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईएमआयचा बोजा आणखी वाढणार आहे.
रिझर्व्ह बँकेने यापूर्वी दोनदा रेपो दरामध्ये ०.९० टक्के वाढ केली आहे. ३ ते ५ ऑगस्टदरम्यान आरबीआयची बैठक होणार आहे. यावेळी आरबीआय रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांपर्यंत बेसिस पॉइंट्सची वाढ करून तो ५.२५ टक्के करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
फेडरलकडून व्याज दरात दुसऱ्यांदा ०.७५ टक्क्यांची वाढ
अमेरिकेतील महागाईने मागील ४१ वर्षांमधील उच्चांक गाठला असून, महागाई कमी करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याज दरात ०.७५ टक्क्यांची वाढ केली आहे. फेडचे ३० वर्षांतील सर्वात आक्रमक धोरणे मानले जात आहे. फेडच्या या निर्णयामुळे गृह, वाहन कर्ज महाग होणार आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, आर्थिक मंदीबाबत फेडरल रिझर्व्हने फारशी चिंता व्यक्त केली नाही.