लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: नव्या वर्षात सरकारी आकडेवारीनुसार महागाई घटली तरीही कर्ज घेणाऱ्यांना मात्र दिलासा मिळालेला नाही. जानेवारी महिन्याच्या पहिल्या २ आठवड्यातच ८ बॅंकांनी व्याज दरवाढ केली आहे. महागाईचे प्रमाण आणखी कमी करण्याचे आरबाआयचे लक्ष्य आहे. त्यामुळे सध्याचे कठाेर धाेरण कायम राहण्याची शक्यता असून, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा रेपाे रेटमध्ये वाढ हाेण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये रेपाे रेट ०.३५ टक्क्यांनी वाढून ६.२५ टक्क्यांवर पाेहाेचला हाेता. त्यावेळी बॅंकांनी व्याज दरांमध्ये वाढ केली हाेती. आताही वाढ करण्यात आली आहे. त्यात कर्ज आणि मुदत ठेवींवरील व्याजाचा समावेश आहे. नाेमुरा या संस्थेच्या अहवालानुसार, महागाईचा दर ४ टक्क्यांच्या आत आणण्याचे आरबीआयचे लक्ष्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीत रेपाे रेटमध्ये ०.२५ टक्के वाढ केली जाऊ शकते.
दुसऱ्या सहामाहीत रेपाे रेटमध्ये कपात शक्य
२०२३ मध्ये आर्थिक विकास दर केवळ ४.५ टक्के राहण्याचा अंदाज नाेमुरा संस्थेने वर्तविला आहे. एकूण जागतिक आर्थिक परिस्थितीचा भारतावरही परिणाम हाेऊ शकताे. अशा वेळी मरगळलेली अर्थव्यवस्था वर आणण्यासाठी या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत रेपाे रेटमध्ये ७५ बेसिस पाॅइंटपर्यंतची कपात हाेण्याची शक्यताही नाेमुराने व्यक्त केली आहे.
‘तर व्याजदर वाढलेलेच’
महागड्या कर्जांपासून लवकर दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेन युद्ध सुरूच राहिल्यास व्याजदर वाढलेलेच राहतील. एकूणच जगभरात अशी परस्थिती राहू शकते, असे दास म्हणाले.