देशातील प्रसिद्ध व्यवसायिक कुटुंबांपैकी एक असलेल्या मोदी कुटुंबातील (Modi Family Dispute) वादावर अखेर तोडगा निघाला आहे. गॉडफ्रे फिलिप्सच्या चेअरमन बीना मोदी यांनी कौटुंबिक वादावर उघडपणे वक्तव्य केलंय. "वडिलांचा वारसा हा विकण्यासाठी नाही," असं वक्तव्य कंपनीच्या चेअरपर्सन ८० वर्षीय बीना मोदी यांनी केलं. हा वारसा आपल्याला सांभाळून ठेवायचा असल्याचंही त्या म्हणाल्या. आपल्या मुलांसोबत बीना मोदी यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. "आम्ही कंपन्या विकणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय त्यांच्या मुलांना कायदेशीररित्या शेअर्स मिळणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
कंपनी विकणार नाही
"आपले पती केके मोदी यांच्या कंपन्या विकण्यासाठी नाहीत," असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं. याबाबत त्यांचा वाद त्यांची दोन मुलं ललित मोदी आणि समीर मोदी यांच्याशी सुरू आहे. बीना मोदी यांची नुकतीच गॉडफ्रे फिलिपच्या चेअरपर्सन म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. कायदेशीर लढाईतून तोडगा काढण्यासाठी आपण आपल्या पतीचा वारसा विकणार नाही. हा वारसा आपल्याला सांभाळून ठेवायचा आणि तो पुढे नेणं ही कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी असल्याचं बीना मोदी म्हणाल्या.
मुलांना आणि मुलीला मिळणार हिस्सा
मोदी कुटुंबातील या वादाची माध्यमांमध्येही मोठी चर्चा झाली. त्यांची दोन मुलं ललित मोदी आणि समीर मोदी यांच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू आहे. आपली आई काही बाहेरच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप दोन्ही मुलांनी केला होता. २०१९ मध्ये या दोघांनी केके मोदींवर कार्यकारी विश्वस्त कराराचं पालन न केल्याचा आरोप केला होता. "दोघांनाही कंपनीचे २५-२५ टक्के शेअर्स मिळतील. चारु मोदी (मुलगी) यांनाही काही वाटा मिळणार आहे," असं यावर उत्तर देताना बीना मोदी म्हणाल्या.