लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: ५.५ कोटी ग्रामीण तरुणांना रोजगार देण्यासाठी आखण्यात आलेली केंद्र सरकारची ‘‘दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’’ केवळ कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. या योजनेत प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळविणाऱ्या तरुणांची संख्या मागील ४ वर्षांत ९० टक्क्यांनी घटली आहे. ४ वर्षांपूर्वी या योजनेत १ लाख ३७ हजार तरुणांना रोजगार मिळाला होता. ही संख्या घटून आता केवळ २२ हजार राहिली आहे.
केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, ४ वर्षांपूर्वी या योजनेत २,४१,५०९ ग्रामीण तरुणांना रोजगार प्रशिक्षण देण्यात आले होते. आता केवळ २३,१८६ तरुणांनाच प्रशिक्षित केले जात आहे.
सरकारने म्हटले की, गेल्यावर्षी २३ हजारांपेक्षा अधिक तरुणांना प्रशिक्षण मिळाले. त्यापैकी २२ हजार तरुणांना रोजगार मिळाला. असे असले तरी, वार्षिक आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर असे दिसून आले आहे की, प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या संख्येत ९० टक्के घसरण झाली आहे.
घोषणा २ लाख नोकऱ्यांची; मात्र मिळाल्या हजारांत
सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने या योजनेची आकडेवारी राज्य सरकारांकडून मागितली होती. आकडेवारी आल्यानंतर योजनेला घरघर लागल्याचे वास्तव समोर आले. प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगार मिळणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असले, तरी प्रत्यक्षात प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्याच घटत आहे. दरवर्षी २ लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट या योजनेत निर्धारित करण्यात आले होते.
अशी झाली घसरण
वर्ष प्रशिक्षण रोजगार
२०१८ २,४१,५०९ १,३७,२५१
२०१९ २,४७,१७७ १,५०,२१४
२०२० ३८,२८९ ०४९,५६३
२०२१ २३,१८६ ०२२,०६७