Join us  

Credit Cards : क्रेडिट कार्डांची संख्या २० कोटींच्या घरात! वाढती लोकप्रियता, आगामी ५ वर्षांत वापर दुपटीने वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 1:52 PM

Credit Cards : भारतात नोकरदारवर्ग, उद्योगपती तसेच तरुणांमध्ये क्रेडिट कार्डांचा वापर वाढला आहे. वाढती लोकप्रियता पाहता क्रेडिट कार्डांचा उद्योग २०२८-२९ पर्यंत दुप्पट होईल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीडब्ल्यूसी या संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

 नवी दिल्ली - भारतात नोकरदारवर्ग, उद्योगपती तसेच तरुणांमध्ये क्रेडिट कार्डांचा वापर वाढला आहे. वाढती लोकप्रियता पाहता क्रेडिट कार्डांचा उद्योग २०२८-२९ पर्यंत दुप्पट होईल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीडब्ल्यूसी या संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हे क्षेत्र वर्षाला १५ टक्के इतके वेगाने वाढत आहे. हा वेग कायम राहिल्यास पुढील पाच वर्षांत देशातील क्रेडिट कार्डांची संख्या २० कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे यात म्हटले आहे. 

अहवालात म्हटले आहे की, क्रेडिट कार्डांची लोकप्रियता वाढली आहे. मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता हा उद्योग तब्बल १०० टक्क्यांनी वाढला आहे. आगामी पाच वर्षांतही याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. 

‘यूपीआय’मुळेही फटका भाजीपाला, चहा, लहान-मोठी खरेदी, हॉटेलिंग, इंधन खरेदी, प्रवासाची तिकिटे आदी सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये ‘यूपीआय’मुळे पेमेंट करणे अगदी सोयीचे बनले आहे. व्यापारीवर्गाचीही यूपीआयमुळे मोठी सोय झाली आहे. यामुळे लोकांना खरेदी करताना खिशात रोकड बाळगणे किंवा व्यवहारासांठी डेबिट कार्डांचा वापर करणे याची गरजच उरलेली दिसत नाही. 

डेबिट कार्डांना घरघर - नागरिक क्रेडिट कार्डांकडे वळत असल्याचा सर्वाधिक फटका डेबिट कार्डांना झाला आहे. डेबिट कार्डांच्या आधारे होणारे व्यवहार आणि त्यांच्या मूल्यातही घट झाली आहे. - आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये डेबिट कार्डांवरील व्यवहार मागील वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के कमी झाले, तर या व्यवहारांचे मूल्य १८ टक्क्यांनी घटले आहे.

टॅग्स :पैसा