Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत जानेवारीमध्ये झाली चार टक्क्यांनी घट

देशातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत जानेवारीमध्ये झाली चार टक्क्यांनी घट

जानेवारी २०२४ या महिन्यात ईपीएफओकडे नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १६.०२ लाख एवढी आहे; मात्र यापैकी प्रथमच नोकरी करणाऱ्यांची संख्या ८.०७ लाख एवढी आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 06:46 AM2024-03-26T06:46:33+5:302024-03-26T06:47:30+5:30

जानेवारी २०२४ या महिन्यात ईपीएफओकडे नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १६.०२ लाख एवढी आहे; मात्र यापैकी प्रथमच नोकरी करणाऱ्यांची संख्या ८.०७ लाख एवढी आहे. 

The number of new jobs in the country fell by four percent in January | देशातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत जानेवारीमध्ये झाली चार टक्क्यांनी घट

देशातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत जानेवारीमध्ये झाली चार टक्क्यांनी घट

नवी दिल्ली : भारतामधील नवीन नोकऱ्यांची संख्या घटत असून, डिसेंबर २०२३ च्या तुलनेत जानेवारी २०२४ मध्ये नोकऱ्यांची संख्या सुमारे चार टक्क्यांनी कमी झाली आहे. सेवानिवृत्तीचे नियोजन करणाऱ्या ईपीएफओ या संघटनेने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. जानेवारी महिन्यामध्ये प्रथमच नोकरीला लागलेल्यांची संख्या त्याआधीच्या महिन्यापेक्षा काहीशी कमी झालेली दिसून येते; मात्र महिलांची टक्केवारी वाढली आहे.

कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे दर महिन्याला किती नोकऱ्या निर्माण झाल्या, किती कमी झाल्या याबाबतची आकडेवारी संपूर्ण देशभरातून जमा केली जाते व त्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार जानेवारी महिन्याबाबतची आकडेवारी रविवारी जाहीर झाली आहे. त्यामध्ये जानेवारी २०२४ या महिन्यात ईपीएफओकडे नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १६.०२ लाख एवढी आहे; मात्र यापैकी प्रथमच नोकरी करणाऱ्यांची संख्या ८.०७ लाख एवढी आहे. 

डिसेंबर २०२३ मध्ये प्रथमच नोकरी करणाऱ्यांची संख्या ८,४०,५८४ होती. ती जानेवारी २०२४ मध्ये ८ लाख ७ हजार ८६५ एवढी खाली आली आहे. म्हणजेच सुमारे ४ टक्के नवीन नोकऱ्या कमी निर्माण झाल्या आहेत.  मात्र त्यामध्ये काही सुधारणा असल्यास ती पुढील महिन्यात कळून येते.

महिलांनी घेतली आघाडी
ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्या नवीन महिलांच्या प्रमाणात गत महिन्यापेक्षा वाढ झालेली दिसून येत आहे. जानेवारी महिन्यामध्ये २,०४,५६९ नवीन महिलांना रोजगार मिळाला असून त्यांचे प्रमाण २५.३२ टक्के असे झाले आहे. आधीच्या डिसेंबर महिन्यात महिलांचे प्रमाण २४.८ टक्के होते. 

१२.१७ लाख सदस्य परतले
ईपीएफओमधून बाहेर गेलेले अथवा ज्यांच्या नोकऱ्या खंडित झाल्या आहेत असे सुमारे १२.१७ लाख सदस्य पुन्हा ईपीएफओकडे परतून आल्याचे या नवीन आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याचा अर्थ या १२ लाखांहून अधिक सदस्यांनी आपल्या नोकऱ्या बदलल्या आहेत, अथवा त्यांच्या संस्था पुन्हा ईपीएफओमध्ये सामील झाल्या आहेत. या सर्व सदस्यांनी आपला निधी हा नवीन आस्थापनांच्या नावे उघडलेल्या खात्यांमध्ये स्थलांतरित केला आहे.

युवकांचे प्रमाण घटले
८ लाख ७ हजार ८६५ नवीन नोकऱ्यांपैकी १८ ते २८ या वयोगटातील ५,३६,४४२ नोकरदार असून त्यांचे प्रमाण ६६.४ टक्के आहे; मात्र डिसेंबर २०२३ मध्ये या वयोगटातील युवकांचे प्रमाण ६७.१७ टक्के (५,६४,६३० नोकऱ्या) असे होते. १८ ते २८ या वयोगटातील युवकांचे नोकऱ्यांमधील प्रमाण वाढणे हे नोकऱ्यांच्या उपलब्धतेमधील मजबुती दर्शवित असते.

Web Title: The number of new jobs in the country fell by four percent in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी