लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या २.१६ लाखांहून अधिक झाली आहे. मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती सादर केली.
देशात तरुण शिक्षणानंतर मोठ्या प्रमाणात उद्योगांकडे वळत आहेत. तरुण स्टार्टअपसह विविध पर्याय आजमावत आहेत. याचेच प्रत्यंतर आयकर भरणाऱ्यांच्या वाढलेल्या प्रमाणातून दिसून येते. एक कोटीहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत जवळपास दुपटीने वाढली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुधारित आयटीआर भरणाऱ्यांची संख्या १२,२१८ इतकी होती. २०२२-२३ मध्ये ही संख्या १०,५२८ इतकी तर २०१९-२० मध्ये ६,५५५ इतकी होती.
करदात्यांच्या एकूण संख्येत वाढ
२०२३-२४ मध्ये ७.४१ कोटी करदात्यांनी आयटीआर दाखल केला. यातील ५३ लाख जणांनी पहिल्यांदा आयटीआर भरले. दहा वर्षांपूर्वी २०१३-१४ या आर्थिक वर्षात ३.३६ कोटी नागरिकांनी आयटीआर दाखल केला होता. २०२१-२२ मध्ये ही संख्या ९० टक्क्यांनी वाढून ६.३७ कोटींवर पोहोचली होती.