Apple iPhone 16 सीरिजची विक्री शुक्रवारपासून सुरू झाली. इतकंच काय तर ते खरेदी करण्यासाठी दिल्ली आणि मुंबईतील अॅपल स्टोअर्सवर लोकांनी मोठी गर्दी केली होती. रात्रीपासून लोक रांगेत उभे होते. तर, दुसरीकडे शुक्रवारी ऑनलाइनही विक्री सुरू करण्यात आली. क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट (Blinkit) आणि बिगबास्केटनं (BigBasket) हा फोन १० मिनिटांत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सुविधा सुरू केली.
Apple iPhone 16 खरेदी करण्यासाठी लोकही या प्लॅटफॉर्मवर दिसले. ऑफलाईन व्यतिरिक्त ऑनलाईनही फोन खरेदी करण्यासाठी क्रेझ लोकांमध्ये दिसून आली. या पार्श्वभूमीवर क्विक कॉमर्स कंपन्यांनी आधीच तयारी केली होती. अनेक ठिकाणी हे फोन आऊट ऑफ स्टॉकही झाल्याचं दिसलं.
तीन मिनिटांना एका फोनची विक्री
क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म बिग बास्केटनं यापूर्वीच आयफोन १६ १० मिनिटांत ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याचं सांगितलं होतं. कंपनीनं सकाळी ८ वाजल्यापासून डिलिव्हरी सुरू केली. कंपनीचे चीफ ग्रोसर हरी मेनन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितलं की, पहिली ऑर्डर ८ वाजता आली आणि अवघ्या ७ मिनिटांत ती ग्राहकांपर्यंत पोहोचली. दरम्यान, बिग बास्केटनं सकाळी ९ च्या सुमारास आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट पोस्ट केली. यात त्यांनी १०० हून अधिक आयफोनची विक्री केल्याचं म्हटलं. तसंच दर ३ मिनिटांनी एक आयफोन विकला गेल्याचंही कंपनीनं म्हटलं.
ब्लिंकिटवरही तुफान प्रतिसाद
ब्लिंकिट दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि लखनौच्या काही भागात आयफोन १६ ची विक्री करत आहे. कंपनीचा दावा आहे की, ते हा फोन १० मिनिटांत ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सकाळी ८ वाजल्यापासून आयफोनची विक्री सुरू झाली. दरम्यान, काही वेळातच ३०० चा आकडा पार करू असं कंपनीचे संस्थापक अल्बिंदर ढींडसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या पोस्टद्वारे म्हटलं.
किती आहे किंमत?
आयफोन १६ सीरिजमधील आयफोन १६ ची किंमत ८० हजार रुपये आहे. हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त फोन आहे. यात १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळतं. याशिवाय आयफोन १६ प्लस आणि आयफोन १६ प्रो मॅक्स देखील उपलब्ध आहेत. १२८ जीबीच्या आयफोन प्लस व्हेरिअंटची किंमत ८९,९०० रुपये आहे.