भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि शेअर बाजार नियामक सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्याविरोधातील रिपोर्टमुळे चर्चेत आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्च फर्मचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक कंपन्यांचं नुकसान केलंय. त्यांच्या अहवालानुसार एकट्या गौतम अदानी यांच्या व्यवसायाला अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक फटका बसलाय. याआधी हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये अमेरिकन कंपनी निकोलाविरोधात असाच एक अहवाल समोर आला होता, ज्यानंतर कंपनीला अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं होतं.
हिंडेनबर्गबद्दल आणि त्याच्या कामाबद्दलही सर्वांना माहिती आहे. परंतु, नॅथन अँडरसननं या कंपनीचं नाव हिंडेनबर्ग का ठेवले? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. दुसरं म्हणजे आपल्या खुलाशानं आणि अहवालांनी जगातील अनेक कंपन्यांना अब्जावधी डॉलर्स मिळवून देणाऱ्या अँडरसननं स्वत: किती पैसे कमावले आणि त्याची नेटवर्थ किती आहे? पण, त्याआधी हिंडेनबर्ग बनवण्यापूर्वी नॅथन अँडरसन काय होता आणि त्याची कल्पना कशी आली हे जाणून घेऊया.
अमेरिकेत जन्म
अँडरसनचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट येथे झाला आणि त्याने एका स्थानिक विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी मिळवली. अँडरसनला अभ्यासानंतर विशेष काम मिळाले नाही, त्यामुळे त्याने मार्च २००४ ते जानेवारी २००५ या काळात इस्रायलमधील रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनं चार्टर्ड अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट अॅनालिस्ट (सीएआयए) आणि चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट (सीएफए) ही पदवीही मिळवली. या अनुभवांमुळे नंतर त्याला आर्थिक बाजारात इनव्हेस्टिगेटिव्ह अप्रोच निर्माण करण्याची कल्पना सुचली.
कशी बनली हिंडेनबर्ग?
अँडरसनने २०१७ मध्ये फायनान्शिअल मार्केटमधील फसवणूक उघड करण्यासाठी एक संशोधन फर्म स्थापन केली. अँडरसनचा असा विश्वास होता की आर्थिक घोटाळे एखाद्या आपत्तीपेक्षा कमी नाहीत, म्हणून त्यानं आपल्या कंपनीचे नाव १९३७ मध्ये आपत्तीला बळी पडलेल्या हिंडरबर्ग या एअरशिपच्या नावावरून ठेवलं. कॉर्पोरेट जगतातील काळ्याबाजाराचा पर्दाफाश करणं हा त्यांचा उद्देश होता.
कसं सुरू झालं काम?
आपल्या स्थापनेनंतर लगेचच हिंडेनबर्गने सुमारे १६ कंपन्यांविरुद्ध चुकीची माहिती आणि कॉर्पोरेट फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आणली होती. ज्या कंपनीच्या विरोधात हा अहवाल उघडकीस आला त्या कंपनीत त्याची कंपनी शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून पैसे कमवत असे. सविस्तर संशोधन करून संपूर्ण प्रकरण अधोरेखित करून बाजारात आणणं हे कंपनीचं काम होतं.
२०२० मध्ये प्रसिद्धी
हिंडेनबर्गला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती वर्ष २०२० मध्ये जेव्हा त्यानं अमेरिकन कंपनी निकोलाविरोधात एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. हिंडेनबर्गनं इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यावर गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आणि आपले तंत्रज्ञान आणि क्षमता लपविल्याचा आरोप केला. या अहवालामुळे निकोलाच्या शेअर्सची किंमत झपाट्यानं घसरली आणि त्याचे संस्थापक ट्रेव्हर मिल्टन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
किती आहे नेटवर्थ?
हिंडेनबर्गसारख्या रिसर्च फर्मची निर्मिती करणाऱ्या अँडरसननं कंपन्यांचं नुकसान तर केलेच, शिवाय स्वत:ही कोट्यवधी रुपये कमावले. मीडिया रिपोर्टनुसार, नॅथन अँडरसननं कधीही आपली संपत्ती जाहीर केली नसली तरी त्याच्याकडे जवळपास ५ कोटी डॉलर्स (४३३ कोटी रुपये) संपत्ती असल्याचा अंदाज आहे.