Lokmat Money > बिझनेस न्यूज > हातातील पेमेंट बँक अडचणीत आलीय; Paytm वर रिझर्व्ह बँकेचा बडगा

हातातील पेमेंट बँक अडचणीत आलीय; Paytm वर रिझर्व्ह बँकेचा बडगा

स्वतःच्या क्षमता न ओळखता आणि रिझर्व्ह बँकेने आखलेली चौकट न पाळता व्यवसाय वाढीसाठी जे प्रयत्न केले ते अखेर त्यांच्या अंगाशी आले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 06:26 AM2024-02-11T06:26:09+5:302024-02-11T06:26:52+5:30

स्वतःच्या क्षमता न ओळखता आणि रिझर्व्ह बँकेने आखलेली चौकट न पाळता व्यवसाय वाढीसाठी जे प्रयत्न केले ते अखेर त्यांच्या अंगाशी आले आहेत. 

The payment bank in hand is in trouble; RBI's ban on Paytm | हातातील पेमेंट बँक अडचणीत आलीय; Paytm वर रिझर्व्ह बँकेचा बडगा

हातातील पेमेंट बँक अडचणीत आलीय; Paytm वर रिझर्व्ह बँकेचा बडगा

देवीदास तुळजापूरकर
बँकिंग तज्ज्ञ

रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी २०२४ रोजी एक सूचना प्रसूत करून पेटीएम पेमेंट बँकेवर कडक निर्बंध लावले आणि बँकिंग जगतात सगळ्यांचेच डोळे विस्फारले. पण पेटीएम पेमेंट बँकेसाठी ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी मार्च २०२२ मध्येदेखील रिझर्व्ह बँकेने असेच काहीसे निर्बंध लावले होते; पण पेटीएम पेमेंट बँकेने त्यापासून धडा शिकून काही सुधारणा केली नव्हती तर मार्च २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेने ज्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या त्या दूर होण्याऐवजी त्या तशाच वाढत गेल्या आणि म्हणूनच अखेर रिझर्व्ह बँकेला त्यांच्या अधिकाराचा बडगा उचलून आता पेटीएम पेमेंट बँकेचे जवळजवळ सगळेच व्यवहार बंद करावे लागले आहेत. 

पेटीएम हे एक ऑनलाइन पेमेंटचे नवीन व्यवसायाचे प्रारूप. त्यांनी सुरू केलेली ही बँक. पेटीएम पेमेंट बँक हेदेखील बँकिग व्यवसायाचे नवीन प्रारूप. डिजिटलायझेशन हा आज परवलीचा विषय झाला आहे. कोरोनानंतर तर त्याला अधिकच चलती आली आहे. राजाश्रय मिळाल्यामुळे एकूणच अशा नवीन प्लॅटफॉर्मना खूप चांगले दिवस आले आहेत, ज्यात पेटीएमचा विशेष पुढाकार होता आणि म्हणून ओघानेच पेटीएम पेमेंट बँकेचादेखील खूप बोलबाला झाला होता.

पेटीएम आणि पेटीएम पेमेंट बँक यांच्या आकांक्षा वाढत गेल्या. डिजिटलायझेशनचा जेवढा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल तेवढा करून घ्यावा, या महत्त्वाकांक्षेतून पेटीएम आणि पेटीएम पेमेंट बँक यांनी उंचच उंच उड्या मारायला सुरुवात केली. स्वतःच्या क्षमता न ओळखता आणि रिझर्व्ह बँकेने आखलेली चौकट न पाळता व्यवसाय वाढीसाठी जे प्रयत्न केले ते अखेर त्यांच्या अंगाशी आले आहेत. 

वॉलेट आणि फास्टॅगचे ग्राहक

  • नऊ कोटी वॉलेटचे तर पाच कोटी ८० लाख फास्टॅगचे ग्राहक हा या बँकेचा पाया. आता या दोन्ही सेवा बंद केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता या बँकेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 
  • फोन पे, गुगल पे आणि आता जिओ पे हे पेटीएम पेमेंट बँकेचे खरे स्पर्धक, पण तरी पेटीएम पेमेंट बँकेचा या व्यवसायातील वाटा सगळ्यात जास्त होता. 
  • आता मात्र या बँकेला अस्तित्वासाठी लढावे लागणार आहे. बँकिंग व्यवसायात ‘ओळख’ हा एक मोठा प्रश्न बनला आहे तर व्यवसाय जसजसा वाढत जातो तसतसे यात तडजोड केली जाते आणि या प्रक्रियेत बँकिंगमधील घोटाळे वाढत जातात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. 

 

हे तर होणारच होते?

  • बँकिंगचे व्यवहार पूर्वी फक्त बँकातूनच व्हायचे, त्यातही व्यवसायात ९० टक्क्यांपेक्षा मोठा वाटा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा होता. यानंतर मोठ्या प्रमाणावर खासगी बँका आल्या. याशिवाय जी संरचना होती, ती प्रदेश ग्रामीण बँक व नागरी सहकारी बँकांची. 
  • यानंतर खासगी क्षेत्रातील लोकल एरिया बँक, मग स्मॉल फायनान्स बँक आल्या. पेमेंट बँक आल्या मग बिगर बँकिंग वित्तीय संस्था आल्या. वन ९६ कम्युनिकेशन ही मूळ कंपनी. तिने सहयोगी म्हणून काढलेली एक बिगर बँकिंग वित्तीय संस्था पेटीएम तर बँकिंग संस्था पेटीएम पेमेंट बँक होय.
  • पेटीएम पेमेंट बँक आणि पेटीएम बिगर बँकिंग वित्तीय संस्थेचे व्यवहार एकमेकांत गुंतलेले आहेत. या दोघांमधील रेषा हळूहळू पुसट होत गेली. 
  • एकमेकांत हितसंबंध निर्माण झाले, यामुळेच पेटीएम असो किंवा पेटीएम पेमेंट बँक या दोन्ही संस्था आता अडचणीत आल्याशिवाय कशा राहतील? या बँकेच्या ग्राहकांना विशेष करून डिजिटल व्यवहारासाठी आता खूप अडचणींना सामोरे जावे लागेल. 
  • बँकिंगमधील नवनवीन प्रयोग लोकल एरिया बँक, स्मॉल फायनान्स बँक आणि आता पेमेंट बँकेच्या मर्यादा लवकर उघडकीस आल्या आहेत. त्यातून भारतीय बँकिंगमध्ये येणारी अनिश्चितता न परवडणारी आहे.

Web Title: The payment bank in hand is in trouble; RBI's ban on Paytm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.