नवी दिल्ली : व्यावसायिक हेतूसाठी बँकेची सेवा घेणारी व्यक्ती ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक या व्याख्येत येत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने म्हटले की, ग्राहक या व्याख्येत बसण्यासाठी संबंधित व्यक्तीने केवळ स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उपजीविका करण्यासाठी सेवा घेतलेली आहे, हे सिद्ध करणे आवश्यक आहे. न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. बी. आर. गवई यांनी हा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले की, ग्राहक ठरविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा एकच एक फॉर्म्युला ठरवला जाऊ शकत नाही. या मुद्द्यावर प्रत्येक प्रकरणात वस्तुस्थिती व समोर आलेले पुरावे तपासून निर्णय घ्यावा लागेल.
न्यायालयाने म्हटले की, एखादी व्यक्ती व्यावसायिक कारणांसाठी सेवा घेते, तेव्हा त्याला ग्राहक म्हणता येऊ शकत नाही. ग्राहक संरक्षण कायदा (सुधारणा) २००२ मध्ये स्पष्ट तरतूद आहे की, व्यावसायिक व्यवहार या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात येत आहेत. मात्र त्याचवेळी जी व्यक्ती स्वयंरोजगारासाठी अशा प्रकारच्या सेवा घेतेे, त्या व्यक्तीस या कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
तक्रारदार हे शेअर ब्रोकर
श्रीकांत जी. मंत्री घार यांच्याा अपिलावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. घार यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तक्रारदार हे ग्राहक या व्याख्येत येत नाहीत, असे कोर्टाने म्हटले. तक्रारदार हे शेअर ब्रोकर असून त्यांनी पीएनबी बँकेविरोधात तक्रार दाखल केली होती.