कोलकाता :भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची घोषणा शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी होईल. त्यामुळे नागरिकांच्या कर्जाचे मासिक हप्ते वाढणार की, आहे तसेच कायम राहणार याचा निकाल उद्या येईल.
एमपीसी बैठकीला बुधवारी प्रारंभ झाला होता. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे बैठकीतील निर्णय शुक्रवारी सकाळी जाहीर करतील. रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. ऑगस्टमधील बैठक आणि आताची बैठक यांच्या मधल्या काळात महागाई वाढली आहे. वाढही मजबूत आहे. जागतिक मानके थोडेसे प्रतिकूल आहेत. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आपला आक्रमक पवित्रा कायम राखून आहे. मात्र, ऑगस्टनंतर कृषी उत्पादनाच्या किमती कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.