सध्या देशभरातील बाजारांत टमाट्याचे भाव गगनाला भिडले आहेत. केवळ टोमॅटोच नाही, तर इतरही भाज्यांचे भाव अनेक पटींनी वाढले आहेत. या आठवड्यात लखनऊमध्ये टोमॅटोचा भाव तब्बल 125 ते 130 रुपये प्रति किलोवर पोहोचला. तसेच, कोचीमध्ये अद्रकाचा भाव 230 रुपये प्रतिकिलो तर हिरव्या मिरचीचा भाव 150 रुपये किलोवर पोहोचला. याशिवाय, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये भाज्यांचे दर 50 रुपये ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
टोमॅटोच्या किंमतीत 3 आठवड्यांत 700 टक्क्यांची वाढ -
महत्वाचे म्हणजे गेल्या 3 आठवड्यांत टोमॅटोच्या किंमतीत 700 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच 2020 आणि 2021 मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव न मिळाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. एवढेच नाही, तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी आपले टोमॅटो रस्त्यावर फेकले होते. मात्र आता टोमॅटोचे दर 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
अवकाळी पावसाचा फटका -
बहुतांश फळे आणि भाज्यांचे भाव हवामानावर अवलंबून असतात. हवामान संवेदनशील असल्यास, फळांच्या किंमती वाढतात. यावेळी उष्णतेचा परिणाम सर्वप्रथम टोमॅटोच्या किंमतीवर दिसून आला. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा आदी राज्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मेट्रो शहरांतील टोमॅटोच्या किंमती -
देशातील चार महत्वाच्या मेट्रो शहरांमधील टोमॅटोच्या किरकोळ किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, दिल्लीत 60 रुपये प्रति किलो, मुंबईत 42 रुपये प्रति किलो, कोलकात्यात 75 रुपये प्रति किलो आणि चेन्नईमध्ये 67 रुपये प्रति किलोपरियंत होती. तसेच, सरकारच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि कर्नाटकातील बेल्लारी येथे टोमॅटोचा भाव 122 रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे.