Join us

नव्या विमानांची खरेदी ग्राहकांच्या पथ्यावर, प्रवासदरही आवाक्यात येणार

By मनोज गडनीस | Published: June 21, 2023 8:25 AM

मुंबई : गेल्या चार महिन्यांत इंडिगो आणि एअर इंडिया या देशातील दोन्ही प्रमुख कंपन्यांनी ९७० पेक्षा जास्त नव्या विमान ...

मुंबई : गेल्या चार महिन्यांत इंडिगो आणि एअर इंडिया या देशातील दोन्ही प्रमुख कंपन्यांनी ९७० पेक्षा जास्त नव्या विमान खरेदीची घोषणा केल्यानंतर येत्या दशकभरामध्ये भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात किमान ५०० पेक्षा नवीन विमाने दाखल होणार आहेत. याचा थेट फायदा हा अनेक नवीन विमान मार्गांवर सेवा उपलब्ध होण्याच्या रूपाने तसेच विमान प्रवासांचे दर आटोक्यात राहण्याने होणार आहे. 

भारतीय विमान कंपन्या सध्या व्यवसाय विस्तार करण्याच्या प्रक्रियेत असून मार्च महिन्यामध्ये एअर इंडियाने ४७० नव्या विमान खरेदीची मागणी नोंदवली, तर सोमवारी पॅरिस येथे सुरू असलेल्या एअर शो दरम्यान इंडिगोने नव्या ५०० विमानांची मागणी नोंदवली. यापूर्वी देखील इंडिगोने ४८० नव्या विमानांची ऑर्डर दिली होती, जी विमाने या महिनाअखेरीपासून ते आगामी काही वर्षांत कंपनीच्या ताफ्यात दाखल होतील.

अकासा कंपनीने देखील ५६ नव्या विमानांची ऑर्डर दिली आहे, तर विस्तारा कंपनीच्या ताफ्यात देखील १७ नवीन विमाने दाखल होणार आहेत. हे लक्षात घेता आतापर्यंत विविध भारतीय कंपन्यांनी एकूण १६०० पेक्षा जास्त विमानांच्या खरेदीची प्रक्रिया चालू केली आहे. तर आगामी दोन वर्षांत याच विमान कंपन्यांतर्फे आणखी किमान १५०० विमानांची खरेदी होण्याचे संकेत मिळत आहेत. देशात सध्या सर्व विमान कंपन्यांची मिळून एकूण ७०० विमाने आहेत. मात्र देशातील वाढती प्रवास संख्या लक्षात घेता ही विमाने अत्यंत अपुरी पडत आहेत. यंदा मे महिन्यामध्ये देशातील प्रवासी संख्येने १ कोटी ३२ लाख प्रवासी संख्येचा सर्वोच्चांक गाठला होता. त्यातच आर्थिक स्थिती खालावल्यामुळे गो-फर्स्ट कंपनीची विमाने ३ मे पासून जमिनीवरच आहेत. त्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी या स्थितीमुळे विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले होते.

आणखी नवे २०० विमानतळ आगामी पाच वर्षांत देशामध्ये आणखी नवे २०० विमानतळ कार्यान्वित होणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केली आहे. त्यामुळे अनेक नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू होणार आहे. हे करतानाच नव्या विमानांच्या खरेदीनंतर विमान कंपन्यांना विविध प्रमुख मार्गांवरील आपल्या दैनंदिन फेऱ्यात वाढ करणेही सुलभ होणार असल्यामुळे विमान प्रवासाचे दरदेखील आटोक्यात राहतील, असा अंदाज विमानवाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :विमान