लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘संकटात संधी शोधणे’ ही म्हण सध्या इशान्य रेल्वेने प्रत्यक्षात उतरविली आहे. या क्षेत्रात ग्रीष्मकालीन विशेष रेल्वे गाड्यांना नियमित करण्याऐवजी त्यांच्या फेऱ्या वाढवून रेल्वे जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. अतिरिक्त भाड्यामुळे प्रवाशांच्या खिशावर मात्र भार पडत आहे.
वास्तविक, कोरोनाची तिसरी लाट संपल्यानंतर रेल्वेत वाढलेल्या प्रवासी संख्येकडे पाहता, रेल्वेने वेगवेगळ्या अवधीत सुमारे अर्धा डझन रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. यातील बहुतांश गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. असे असतानाही त्यांना नियमित करण्याऐवजी रेल्वे त्यांचा संचालन अवधी वाढवित आहे. यातील बहुतांश साप्ताहिक रेल्वे आहेत. त्यांच्या फेऱ्या नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. याचा प्रवाशांच्या खिशावर जास्तीचा भार पडत आहे. कारण या विशेष गाड्या असल्यामुळे त्यांचे भाडे ३० टक्के अधिक आहे.
चालणाऱ्या विशेष गाड्या
१० ऑगस्ट : दरभंगा-अजमेर
२५ ऑक्टो. : ढेहर बालाजी-तिरुपती
२७ ऑक्टो. : जयपूर-वांद्रे टर्मिनस
३० ऑक्टो. : ढेहर बालाजी-साईनगर शिर्डी
३१ ऑक्टो. : अजमेर-वांद्रे टर्मिनस-अजमेर
२४ नोव्हें. : वांद्रे टर्मि. -अजमेर
२५ नोव्हें. : वांद्रे टर्मि. -भिवानी-बोरीवली
२६ नोव्हेंबर : वांद्रे टर्मि. -बाडमेर
२९ नोव्हेंबर : वांद्रे टर्मि. -उदयपूर
२९ नोव्हेंबर : वांद्रे टर्मि. -उदयपूर
रेल्वे काय म्हणते?
रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले की, विशेष रेल्वे गाड्या निश्चित कालावधीत चालविल्या जातात. त्यांचे भाडे सामान्य रेल्वेपेक्षा अधिक असते. या गाड्यांच्या अवधीत विस्तार ही सामान्य बाब आहे.