नवी दिल्ली : भारताचा वीज वापर जगाच्या तुलनेत तिप्पट वेगाने वाढत असून, आगामी २० वर्षांत जागतिक ऊर्जा मागणीतील वृद्धीत भारताचा वाटा तब्बल २५ टक्के असेल, असे प्रतिपादन भारताचे पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले आहे.
दावोस येथे आयोजित ‘जागतिक आर्थिक मंच’च्या सत्रात पुरी म्हणाले की, भारतास ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी २०२८ ची वाट पाहावी लागणार नाही. हे उद्दिष्ट गाठण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड महत्त्वाचे योगदान देईल.
दुर्बल घटकांचीही योग्य काळजी घेणार
भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. अर्थव्यवस्था जशी वाढत जाईल त्यानुसार विजेचा वापरही वाढणार आहे. आर्थिक विकास, विजेचा वाढणारा खप आणि ऊर्जास्रोतांमध्ये होत असणारे बदल होत असताना दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष होऊ नये, याची काळजी सरकार घेणार आहे. आमचे हरित हायड्रोजन धोरण व्यापक स्तरावर यशस्वी ठरणार आहे, असेही पुरी म्हणाले.