न्यूयॉर्क : कच्च्या तेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होत असतानाच जागतिक बाजारात डिझेलची टंचाई निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे. याचा परिणाम म्हणून आगामी काळात डिझेलच्या दरात वाढ होऊन महागाईचा पारा पुन्हा वर चढण्याचा धोका निर्माण झाला आहे.अमेरिकेत डिझेलचा साठा ४० वर्षांच्या नीचांकावर गेला आहे. युरोपातही हीच स्थिती आहे. येत्या मार्चपर्यंत स्थिती आणखी वाईट होऊ शकते. कारण, मार्चमध्ये रशियाई डिझेलच्या सागरी आयातीवर प्रतिबंध घालण्यात येणार आहे.गरीब देशांवर होणार प्रतिकूल परिणाम -डिझेलची जागतिक निर्यात घटत आहे. पाकिस्तानसारख्या गरीब देशांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. डिझेल महाग झाल्यामुळे बस, ट्रक, जहाज, रेल्वे यांची भाडेवाढ होईल. बांधकाम व शेती औजारे आणि कारखान्यांतही डिझेलचा वापर होत असल्यामुळे त्यावरही प्रतिकूल परिणाम होईल.
८.१७ लाख कोटी रुपयांचा अमेरिकेस फटका -राइस विद्यापीठाच्या ‘बेकर इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी’चे एनर्जी फेलो मार्क फिनली यांनी सांगितले की, डिझेल महागल्यामुळे अमेरिकेस १०० अब्ज डॉलरचा (८.१७ लाख कोटी रुपये) फटका बसेल. सार्वजनिक वाहतूक सेवेवर मोठा परिणाम दिसेल.
५०% अमेरिकेत डिझेल महाग -अमेरिकेत डिझेल महाग होत आहे. बेंचमार्क न्यूयॉर्क हार्बरचे दर यंदा आतापर्यंत ५० टक्के वाढले आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीस डिझेल ४.९० डॉलर प्रतिगॅलन (१०५.७३ रुपये लीटर) होते. नवी दिल्लीत डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रतिलीटर होता.
भारतावर थेट परिणाम डिझेल दरवाढीचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होईल. भारताची रिफायनिंग क्षमता चांगली आहे, त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. मात्र, डिझेलचे दर वाढतील. दरवाढीचा सर्वाधिक फटका वाहतूक व कृषी क्षेत्रावर होईल. मालभाडे वाढल्यास महागाई वाढेल.
डिझेलचे दर ५ महिन्यांपासून स्थिर : देशात डिझेलचे दर मागील ५ महिन्यांपासून स्थिर आहेत. जुलैमध्ये महाराष्ट्रात पेट्रोल ५ रु., तर डिझेल ३ रु. स्वस्त झाले होते. इतर राज्यांत दर कायम आहेत.