Join us

रुपया घसरला अन् शिक्षणाचा खर्च वधारला, तब्बल २५ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 7:51 AM

जुलैमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत ही ७९ रुपये होती. मात्र, अवघ्या साडेतीन महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ वर पोहोचला आहे.

मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांत झालेल्या घसरणीची धग परदेशात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या खिशापर्यंत पोहोचली आहे. यंदाच्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरले गेले असले तरी, रोजचे खर्च आणि पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क याकरिता मोठा भार पडणार आहे.

जुलैमध्ये डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत ही ७९ रुपये होती. मात्र, अवघ्या साडेतीन महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ वर पोहोचला आहे. याचा अर्थ अवघ्या साडेतीन महिन्यांत एका डॉलरमागे किमान ४ रुपयांनी खर्च वाढला आहे. 

चलनवाढ सर्वोच्च पातळीवर अर्थतज्ज्ञ एम. राजेश्वरन यांनी सांगितले की, अमेरिकेत सध्या चलनवाढ सर्वोच्च पातळीवर आहे. तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. परिणामी, अनेक गुंतवणूकदार अमेरिकेत जात आहेत. त्यामुळे डॉलर महाग होत चालला आहे.

माझे हे अमेरिकेतील शिक्षणाचे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा माझ्या वार्षिक खर्चामध्ये किमान २५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. मी पार्टटाइम जॉबच्या शोधात आहे. नोकरी मिळाली तर ठीक; अन्यथा पुढील खर्च करणे शक्य होणार नाही.     - अमेय दाते, विद्यार्थी

गेल्या वर्षीपर्यंत मी ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो त्याचे भाडे प्रतिमहिना ७५० डॉलर इतके होते. मात्र, या वर्षीपासून ते एक हजार डॉलर झाले आहे. रुपयाच्या घसरणीमुळे महिन्याचा खर्च आटोक्यात ठेवणे शक्य होत नाही. भूक लागली म्हणून बर्गर खातानाही विचार करावा लागतो.     - चिंतन दरेकर, विद्यार्थी

टॅग्स :शिक्षणव्यवसाय