नवी दिल्ली : एखाद्या देशाच्या आर्थिक स्थिरतेमध्ये त्या देशाचा सुर्वणभंडार फार महत्त्वाची भूमिका बजावत असताे. आर्थिक संकट आल्यास हा साठा तारण ठेवण्याचाही पर्याय देशासमाेर असताे. गेल्या काही वर्षांमध्ये जगातील प्रमुख देशांमध्ये सुवर्णभंडार वाढविण्याची स्पर्धाच लागलेली दिसत आहे.
या स्पर्धेत चीन आणि अमेरिकेसह भारतही आघाडीवर आहे. मात्र, अमेरिकेकडे सर्वाधिक साठा असून इतर देश त्या तुलनेत फार मागे आहेत. अमेरिकेकडे जगात सर्वाधिक सोने साठा असून, जर्मनी दुसऱ्या स्थानी आहे. सोने साठ्याच्या बाबतीत भारताचा जगात ९ वा क्रमांक लागतो.
फोर्ब्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
चलनी नोटांच्या किमतीच्या बरोबरीत सोने जमा ठेवण्याची पद्धत इ.स. १८०० मध्ये जगभरात अंगीकारली होती. मात्र, १९७० मध्ये बहुतांश देशांनी अधिकृतरीत्या ही पद्धत त्यागली.
देशांकडे का असतो सोने साठा?
- सोन्याला स्थिर आणि आधारभूत साठा मूल्य असते.
- अनिश्चिततेच्या काळात सोने अर्थव्यवस्थेला स्थैर्य देते.
- देशाच्या चलनाच्या मूल्यास सोन्यामुळे आधार मिळतो.
- अनेक देश आजही सोने साठ्यास चलनाच्या स्थैर्याची पद्धती मानतात.
कशामुळे वाढ?
२०२३ मध्ये जगभरातील मध्यवर्ती बॅंकांनी १,४०० टनांपेक्षा जास्त साेने खरेदी केले.
२०४५ पर्यंत जगातील सोन्याचे उत्खनन घटण्याची शक्यता आहे.
आतपासूनच अनेक देश सोने खरेदीवर भर देत आहेत.
साेन्याचा सर्वाधिक साठा असलेले टाॅप १० देश
अमेरिका ८१,३३६.४६ टन
जर्मनी ३,३५२.६५ टन
इटाली २,४५१.८४ टन
फ्रान्स २,४३६.८८ टन
रशिया २,३३२.७४ टन
चीन २,१९१.५३ टन
स्वित्झर्लंड १,०४० टन
जपान ८४५.९७ टन
भारत ८००.७८ टन
नेदरलँड्स ६१२.४५ टन