मुंबई – मागील २ वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वांचं जनजीवन विस्कळीत झाले. देशात कोरोनाच्या लाटेचा फटका केरळ आणि महाराष्ट्राला जास्त बसला. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात परिस्थिती चिंताजनक बनली होती. मात्र यातही राज्यातील तळीरामांनी नवा रेकॉर्ड बनवला आहे. दारू पिणारे शौकीन यांनी सर्वाधिक दारू पिऊन वेगळी नोंद केली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १७ हजार १७७ कोटींहून अधिक दारू विक्री झाली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास २ हजार कोटींनी जास्त आहे. महाराष्ट्र उत्पादन शुल्कने सांगितले की, २०२१-२२ या काळात मागील ३ वर्षाच्या तुलनेत सर्वाधित दारू विक्री झाली. २०२०-२१ च्या तुलनेने १७ टक्के जास्त विक्री झाली. मात्र असं असूनही राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाला ठरवलेले टार्गेट पूर्ण करता आले नाही. उत्पादन शुल्क विभागाने २०२१-२२ या काळात १८ हजार कोटी रुपये महसूल जमा करण्याचं लक्ष्य ठेवले होते. ते यावर्षी ९५ टक्केच यशस्वी झाले.
२०१९-२० या काळात राज्यात २ हजार १५७ लाख लीटर विक्री झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हा आकडा १ हजार ९९९ लाख लीटरपर्यंत घसरला होता. मात्र पुढच्याच वर्षी यात प्रगती झाली आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ कालावधीत राज्यातील तळीरामांनी २ हजार ३५८ लाख लीटर दारू(IMFL) खरेदी केली. इतकेच नाही तर बिअर, देशी दारू याचीही चांगली विक्री झाली. महामारीच्या सुरुवातीनंतर पहिल्यांदाच IMFL सह बिअर आणि देशी दारूच्या विक्रीत वाढ झाली आहे. राज्यात २०२०-२१ काळात २२ टक्के बिअरमध्ये विक्री घट झाली होती. तर २०२१-२२ या काळात १४ टक्क्यांनी विक्री वाढल्याचं दिसून आले.
दारू विक्री वाढण्याचं कारण...
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, २०२१-२२ मध्ये दारू विक्रीत ७ ते १२ टक्के वाढ झाल्याचे दिसते. त्यापूर्वी २०२०-२१ मध्ये घट आढळली होती. खूप वर्षांनी हे चित्र पाहायला मिळालं आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर पुन्हा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले. आर्थिक उलाढाल होऊ लागली. त्यामुळे दारू खरेदी करण्याची क्षमता वाढली. लोकं एकमेकांना भेटू लागले त्याच कारणाने दारू विक्रीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.