Join us  

तरुणपणीच रिटायर होण्याचे ‘सिक्रेट’! ‘फायर’ ही चळवळ नेमकी काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 5:58 AM

‘फायनान्शिअल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली’ म्हणजेच ‘फायर’!

आपल्याला जगण्यासाठी किती पैसा लागतो? आपल्याकडे किती पैसा असला म्हणजे आपल्याला ‘सुखी-समाधानी’ आयुष्य जगता येईल? आयुष्यातली किती वर्षे आपण काम करण्यासाठी घालवायची आणि कोणत्या वयात ‘निवृत्त’ व्हायचं? - अर्थातच वरील प्रश्नांसाठी प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल. जगण्यासाठी पैसा लागतो, त्यासाठी धावावं, पळावं लागतं, हे अगदी निर्विवाद; पण किती धावायचं? - पार आयुष्याची संध्याकाळ होईपर्यंत? मग आपल्या मनासारखं आयुष्य आपण कधी जगायचं?.. त्यामुळे निवृत्तीचं वय होईपर्यंत काम करीत राहायचं, ही संकल्पनाच आजच्या बहुतांश तरुण पिढीला मान्य नाही. त्यामुळे जे काही कमवायचं, ते तरुण वयात कमवून घ्या, निवृत्तीनंतरच प्लॅनिंग आत्ताच करा आणि तरुणपणीच निवृत्त व्हा, अशी आर्थिक स्वातंत्र्याची एक नवी चळवळच तरुणांमध्ये येऊ घातली आहे. या चळवळीचं नाव आहे ‘फायनान्शिअल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली’ म्हणजेच ‘फायर’!१९९२मध्ये एक ‘युवर मनी ऑर युवर लाइफ’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. विकी रॉबिन आणि जो डॉमिंगेज यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यावेळी प्रचंड गाजलं होतं. त्यातल्याच काही संकल्पना घेऊन ‘फायर’ ही चळवळ सध्या उभी राहते आहे.

या चळवळीचं वैशिष्ट्य तरी काय?१- आयुष्यभर मरमर काम करायचं नाही.२- भले आत्ता तरुणपणात जे काही काम करायचं ते करून घ्या; पण तरुणपणातच निवृत्त व्हा आणि आपल्या आयुष्याचा आपल्या मनाप्रमाणे उपभोग घ्या.३- आत्ताच इतकं कमवून घ्या की नंतर कमवायची काही गरजच उरणार नाही. ४- त्यासाठी नियोजनपूर्वक काटकसर, जास्तीत जास्त बचत व स्मार्ट गुंतवणूक या त्रिसूत्रीचा उपयोग करायचा.५- आपल्या कमाईतली जास्तीत जास्त ३० टक्के रक्कम खर्च करायची आणि किमान ७० टक्के रकमेची बचत, गुंतवणूक करायची. आयुष्यभर ‘मरमर’ न करता तुम्हालाही जगायचंय मनाप्रमाणे आयुष्य? पण हे नेमकं करायचं कसं? - पाहूया पुढच्या भागात..