मुंबई :
वीजसंकटाचा मोठा फटका उद्योग क्षेत्रासह नागरिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे. खाणीतून कोळसा काढण्याचे नऊ वर्षातील सर्वात कमी प्रमाण यंदा नोंदले गेले. ३८ वर्षांत यंदा उन्हाळ्यात विजेची मागणी सर्वाधिक असण्याची चिन्हे आहेत.
गेल्या आठवड्यात देशातील मागणी १.४ टक्के वाढल्याने विजेचा तुटवडा जाणवू लागला. वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक कंपन्यांना उत्पादन थांबवावे लागले.
१ एप्रिलला वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा साठा सरासरी नऊ दिवसाचा होता, जो २०१४ नंतरचा सर्वात कमी आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार सरासरी किमान २४ दिवसाचा कोळसा साठा असणे आवश्यक आहे. भारताच्या वीज उत्पादनात कोळशाचा वाटा जवळपास ७५ टक्के इतका मोठा आहे.
अनेक राज्यात भारनियमन सुरू
- महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या औद्योगिक राज्यांनी लोडशेडिंगला सुरुवात केली आहे.
- अधिकाऱ्यांनी सांगितले की, झारखंड, बिहार आणि हरियाणा व उत्तराखंड या राज्यांमध्येही ३ टक्क्यापेक्षा अधिक वीजटंचाई असून, तेथेही भारनियमनाला सुरुवात होणार आहे.
रेल्वे ठरली कारण : वीज प्रकल्पांना कोळसा पोहोचविण्यात रेल्वेची कमतरता हेही पुरवठा विस्कळीत होण्याचे मोठे कारण आहे. कोळसा पुरवठ्यासाठी दररोज ४५३ रेल्वेगाड्या लागतात, ज्या सध्या केवळ ३७९ आहेत.