Join us  

शेअर बाजाराचा उत्साह शिगेला, शपथविधीनंतर बाजार ७७ हजारांच्या पार, ५ दिवसांत ५००० अंकांची उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 6:25 AM

Stock Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बाजारात असलेले चिंतेचे सावट संपल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी बाजाराने ३८६ अंकांच्या वाढीनंतर सार्वकालिक ७७,०७९ अंकांचा उच्चांक गाठला होता.

मुंबई - लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बाजारात असलेले चिंतेचे सावट संपल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी बाजाराने ३८६ अंकांच्या वाढीनंतर सार्वकालिक ७७,०७९ अंकांचा उच्चांक गाठला होता. निफ्टीनेही १२१ अंकांची उसळी घेत २३,४११ अंकांची विक्रमी झेप घेतली होती. 

दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स २०३ अंकांच्या घसरणीसह ७६,४९० अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी ३० अंकांनी घसरून २३,२५९ वर स्थिर झाला. गेल्या चार दिवसात बाजार ५००० अंकांनी वाढला आहे.

आज सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १७ समभागांमध्ये तेजी, तर १३ मध्ये घट दिसून आली. पॉवरग्रीड, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक, नेस्ले आणि एसबीआयचे शेअर्स वाढले. महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिसच्या समभागांमध्ये घसरण झाली. 

- रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीचे सरकार देशात असणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. राजकीय स्थैर्याची एकप्रकारे खात्री मिळाल्याने बाजाराला बळ मिळाले. - १२ जून रोजी महागाईचे आकडे जाहीर केले जातील. आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की, किरकोळ महागाई एप्रिलच्या ४.८३ टक्केवरून घसरून ४.८० टक्केवर येऊ शकते. महागाई नियंत्रणात राहणे हा बाजारासाठी सकारात्मक संदेश आहे. - आरबीआयने जीडीपीच्या अंदाजात वाढ केल्याने मागील सप्ताहात अखेरच्या दिवशी ७ जून रोजी सेन्सेक्सने ७६,७९५चा विक्रमी उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही २३,३२० अंकांपर्यंत उसळला होता. यामुळे बाजाराला सकारात्मक उर्जा मिळाली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक