प्रसाद गो. जोशी
गतसप्ताहामध्ये शेअर बाजाराने विक्रम केल्यानंतर बाजारावर विक्रीचा दबाव येऊन बाजार काहीसा खाली आला. मात्र, आगामी सप्ताहामध्ये पुन्हा तेजी राहण्याची अपेक्षा आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल, औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी आणि परकीय व देशांतर्गत वित्तसंस्थांची कामगिरी यावरच आगामी सप्ताहातील बाजाराची दिशा ठरणार आहे.
गतसप्ताहामध्ये शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५६१.८९ अंशांनी वाढून ६५,२८०.४५ अंशांवर बंद झाला. त्याआधी ६५,८९८.९८ अंश अशी उच्चांकी धडक निर्देशांकाने मारली. निफ्टीमध्ये १४२.७५ अंशांची वाढ होऊन तो १९,३३१.८० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची कामगिरीही चांगली राहिली. उच्चांकानंतर बाजारावर विक्रीचे दडपण आले.
आगामी सप्ताहामध्ये काही कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यावर बाजाराचा रोख अवलंबून राहणार आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक उत्पादनाबाबतची आकडेवारी जाहीर होणार असून, ती आशादायक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार पुन्हा तेजीत राहू शकेल. याशिवाय महागाईच्या आकड्यांवरही बाजाराचे लक्ष राहणार आहे.
भांडवल ३०० लाख कोटींवर
गतसप्ताहात मुंबई शेअर बाजारात नोंदलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण भांडवलमूल्य ३०० लाख कोटींचा टप्पा पार करून गेले. त्यानंतर बाजार कमी झाल्याने ते खाली आले. सप्ताहाच्या अखेरीस या मूल्यामध्ये एकूण ३ लाख ३० हजार ४९८.९६ कोटी रुपयांनी वाढून २,९९,७८,६२३.५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
टाेमॅटो, कांदा व भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्याचा एकूण महागाईच्या दरावर काय परिणाम होतो, हे बघणे महत्त्वाचे आहे. कारण त्यावरच आरबीआयचे पुढील तिमाही पतधोरण अवलंबून राहणार आहे. त्याचप्रमाणे परकीय व देशांतर्गत वित्तसंस्थांच्या कामगिरीकडेही बाजाराचे लक्ष असेल.