Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजाराची नजर आता रिझर्व्ह बँकेकडे...

शेअर बाजाराची नजर आता रिझर्व्ह बँकेकडे...

गतसप्ताहात अमेरिकेने व्याजदरामध्ये केलेल्या वाढीने जगभरातील शेअर बाजार अस्थिर असलेले दिसून आले.

By प्रसाद गो.जोशी | Published: September 26, 2022 11:15 AM2022-09-26T11:15:32+5:302022-09-26T11:21:19+5:30

गतसप्ताहात अमेरिकेने व्याजदरामध्ये केलेल्या वाढीने जगभरातील शेअर बाजार अस्थिर असलेले दिसून आले.

The stock market s eyes are now on the Reserve Bank stock market crash investors loss more | शेअर बाजाराची नजर आता रिझर्व्ह बँकेकडे...

शेअर बाजाराची नजर आता रिझर्व्ह बँकेकडे...

प्रसाद गो. जोशी  

गतसप्ताहात अमेरिकेने व्याजदरामध्ये केलेल्या वाढीने जगभरातील शेअर बाजार अस्थिर असलेले दिसून आले. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होऊन निर्देशांकांमध्ये घट झालेली दिसून आली. आगामी सप्ताहात डेरिव्हेटिव्हजची सौदापूर्ती आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक या दोन घडामोडी आहेत. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक झाला. परिणामी डॉलर मजबूत होऊन रुपयाला मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला. अमेरिकेतील व्याजदरामधील वाढ ही परकीय वित्तसंस्थांना फलदायी ठरणार आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय बाजारात विक्रीचा क्रम  कायम राखला. यामुळे बाजार आणखी खाली गेला.

आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक येत्या सप्ताहात होणार असून, शुक्रवारी पतधोरणाची घोषणा होणार आहे. व्याजदरामध्ये सुमारे अर्धा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जे आणखी महाग होऊन चलनवाढीला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. या पतधोरणापूर्वी डेरिव्हेटिव्ह व्यवहारांची सौदापूर्ती असल्याने बाजार काहीसा नरम राहण्याची शक्यता आहे.

परकीय गुंतवणूकदार पुन्हा घाबरले...
परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहात भारतीय बाजारात ४३६२ कोटी रुपयांची विक्री केली आहे. बळकट झालेला डॉलर आणि अमेरिकेतील वाढलेले व्याजदर यामुळे या संस्थांनी भारतातून पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिलेले दिसते. सप्टेंबर महिन्याचा विचार करता या संस्थांनी भारतीय भांडवल बाजारातून २४४५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. आधीच्या महिन्यात या संस्थांनी २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 

तीन लाख कोटी रुपये बुडाले
शेअर बाजार निर्देशांकांमध्ये घट झाल्याने गतसप्ताहात गुंतवणूकदारांचे भांडवल तीन लाख चार हजार २५५.२७२ कोटी रुपयांनी कमी झाले आहे. आधीच्या सप्ताहात २ कोटी ७९ लाख ६८ हजार कोटी रुपयांचे भांडवल या सप्ताहाच्या अखेरीस २ कोटी ७६ लाख ६४ हजार ५६६.७९ कोटी रुपयांवर आले आहे.

Web Title: The stock market s eyes are now on the Reserve Bank stock market crash investors loss more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.