Story of Byju Raveendran Rise And Fall: गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. स्टार्टअपमध्ये बायजूस (Byjus) हा सर्वात तेजस्वी तारा बनला होता. देशातील एड्युटेक सेगमेंटमधील ती पहिली युनिकॉर्न कंपनी होती. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी, ज्याचं मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स आहे.
कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना फोर्ब्सच्या यादीतही स्थान मिळाले, परंतु आता कंपनी डबघाईला आली आहे. कर्मचार्यांचे पगार देण्यासाठी मालमत्ता आणि बायजूचे शेअर्स गहाण ठेवावे लागत आहेत. इतकंच नाही, तर दोन महिने कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतनही मिळालेलं नाहीये. एकेकाळी टॉपला असणाऱ्या बायजूसच्या या पतनामागील कारण काय हे जाणून घेऊया.
कोरोनाच्या काळात तेजीनं विस्तार
बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न २०११ मध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ, यांनी सुरू केली होती. याआधी ते मुलांना कोचिंग द्यायचे. ही कंपनी ऑनलाइन व्हिडीओ आधारित शिक्षणावर भर देत असे. २०१५ मध्ये देशातील 'स्टार्टअप बूम' दरम्यान, या कंपनीने एक अॅप विकसित केलं, जे आपण Byju's नावानं ओळखतो. २०१८ पर्यंत ही कंपनी देशातील पहिली एड्युटेक युनिकॉर्न बनली होती. कोविडच्या काळात Byju's नं या सेगमेंटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं. या काळात Byju's चा विस्तार वेगानं झाला, पण कोविड संपल्यानंतर शाळा सुरू होताच कंपनीची परिस्थिती बदलली.
अनेक कंपन्यांचं अधिग्रहण
बायजूकडे स्वत:चे फारसे फंड्स नव्हते आणि ते इतर स्टार्टअप्सप्रमाणे व्हेंचर फंडिंगवर अवलंबून होते. कोविडच्या काळातील वाढीमुळे कंपनीला अतिआत्मविश्वास आला आणि त्यांनी एकामागून एक अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं. यामध्ये ३०० मिलियन डॉलर्सच्या 'व्हाईटहॅट ज्युनियर' डीलची बरीच चर्चा झाली. यानंतर त्यांनी 'आकाश एड्युकेशनल सर्व्हिसेस' मिळवली. आकाश एड्युकेशनल सर्व्हिसेस हे भारतातील सर्वोत्तम पीएमटी आणि आयआयटी प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. बायजूनं २०२१ मध्ये ९५० मिलियन डॉलर्समध्ये ही संस्था विकत घेतली. यानंतर बायजूच्या अडचणी सुरू झाल्या.
नोव्हेंबर २०२१ मध्ये बायजूसनं विदेशी बाजारातून १.२ अब्ज डॉलर्सचं कर्ज उभारलं. कंपनीनं सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांचे निकाल जाहीर केले, त्यात कंपनीचा तोटा १८ पटीनं वाढून ४,५८८ कोटी रुपये झाला. मे २०२३ मध्ये बायजूसनं डेव्हिडसन केम्पनर सोबत २००० कोटी रुपयांचा निधी गोळा केला. यानंतर जून २०२३ मध्ये बायजूस परदेशातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी ठरली.
अनेक गुंतवणूकदार पडले बाहेर
यानंतर अनेक मोठे गुंतवणूकदार कंपनीतून बाहेर पडले. कंपनी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिला. बायजूसमध्ये नोकरकपात सुरू झाली. या सगळ्यानं बायजूसचं कंबरडं मोडलं. त्यांना मीडियामध्येही अनेक वादांना सामोरं जावं लागलं. दरम्यान, बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना त्यांच्या मूळ कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता गहाण ठेवावी लागली आहे. त्यांना आपले सर्व शेअर्सही गहाण ठेवावे लागलेत.
संपत्ती आली शून्यावर
स्टार्टअप्सच्या जगात उंच भरारी घेणारे बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन जमिनीवर आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ₹१७,५४५ कोटींवरून शून्यावर आली. 'जगातील सर्वात श्रीमंत' व्यक्तींच्या यादीत बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्यावर घसरल्यानं स्टार्टअपला भेडसावत असलेल्या समस्या दिसून येत आहेत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्स २०२४ नुसार, बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ₹१७,५४५ कोटी ($२.१ अब्ज) वरून शून्यावर आली आहे.