Ratan Tata News : रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वावर नजर टाकली तर ते केवळ उद्योजकच नाही, तर ते उदार व्यक्ती, लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान होते. १९९१ ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि या काळात त्यांनी व्यवसाय क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित केले. देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाला उंचीवर आणले. त्यांनी टाटांना आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवलं.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी नवल आणि सूनी टाटा यांच्या घरात झाला. त्यांनी १९६२ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी मिळवली आणि १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. त्यांचे वडील नवल टाटा हे एक यशस्वी उद्योगपती होते आणि त्यांनी टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रतन टाटा यांची आई सूनी टाटा या गृहिणी होत्या.
१९६२ मध्ये टाटा समूहात रुजू
रतन टाटा १९६२ मध्ये टाटा समूहात सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी जमशेदपूर येथील टाटा इंजिनीअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या (आता टाटा मोटर्स) प्रकल्पात सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. विविध कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर १९७१ मध्ये त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी संचालक म्हणून नेमणूक झाली. १९८१ मध्ये, त्यांची टाटा इंडस्ट्रीज या समूहाच्या दुसऱ्या होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली, जिथे त्यांनी समूहाची रणनीती थिंक टँक आणि उच्च-तंत्रज्ञान व्यवसायांमध्ये नवीन उपक्रमांचे प्रवर्तक म्हणून रूपांतरित करण्याची जबाबदारी पार पाडली.
१९९१ ते २८ डिसेंबर २०१२ रोजी निवृत्त होईपर्यंत ते टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे चेअरमन होते. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या आघाडीच्या टाटा कंपन्यांचे ते अध्यक्ष होते. भारत आणि परदेशातील विविध संघटनांशीही ते जोडले गेले होते.
रतन टाटा मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळावरही होते. ते सर रतन टाटा ट्रस्ट अँड अलाइड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट अँड अलाइड ट्रस्टचे अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे ते अध्यक्ष होते. कॉर्नेल विद्यापीठ आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळावरही त्यांनी काम केलं.
कोणते मिळाले सन्मान?रतन टाटा यांचे प्रमुख पुरस्कार आणि सन्मान
१. पद्मभूषण (२०००) २. पद्मविभूषण (२००८) ३. मानद नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (२००९) ४. इंटरनॅशनल हेरिटेज फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
सामाजिक कार्य
रतन टाटा यांच्या परोपकार आणि समाजसेवेच्या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ट्रस्ट आणि टाटा फाऊंडेशनने शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि तांत्रिक नाविन्यपूर्ण क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे.
रतन टाटा हे त्यांच्या परोपकारासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने कॉर्नेल विद्यापीठात भारतातील पदवीधर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी २८ दशलक्ष डॉलर्सचा टाटा स्कॉलरशिप फंड स्थापन केला. २०१० मध्ये टाटा समूहाने हार्वर्ड बिझनेस स्कूल (एचबीएस) येथे कार्यकारी केंद्र बांधण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली, ज्याचं नाव टाटा हॉल असं ठेवण्यात आले. २०१४ मध्ये, टाटा समूहाने आयआयटी-मुंबईला ९५ कोटी रुपयांची देणगी दिली आणि टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाइनची (टीसीटीडी) स्थापना केली.