Happy Birthday Gautam Adani : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. 24 जून 1962 रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या गौतम अदानी यांना व्यवसायाचा वारसा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर एवढे मोठे साम्राज्य उभे केले आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल एक रंजक किस्सा सांगणार आहोत. स्वतः अदानी यांनी याबद्दल सांगितले आहे.
'वाईट काळ विसरलेला बरा...'
गौतम अदानी नेहमी म्हणतात की, एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल, तर त्यावर फार विचार करण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. अदानी आतापर्यंत अनेक प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर आले आहेत. यात त्यांच्या अपहरणाच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अदानी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे अपहरण झाले होते, पण अपहरणकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांची सुटका केली.
आपल्या अपहरणाबद्दल बोलताना गौतम अदानी म्हणाले, वाईट काळ विसरणे चांगले असते. मी प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेतो. माझे अपहरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी सुटका झाली. पण ज्या रात्री माझे अपहरण झाले त्या रात्रीही मी शांत झोपलो होतो. कारण हातात नसलेल्या गोष्टींची फार काळजी करून फायदा नाही. विशेष म्हणजे, गौतम अदानी यांनी आयुष्यात दोनदा मृत्यू पाहिला आहे.
26/11 ची रात्रही अदानींना आठवते
अदानींच्या म्हणण्यानुसार, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते ताज हॉटेलमध्ये होते. दुबईहून आलेल्या मित्रांसोबत ते ताज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवादी गोळ्या झाडत होते. याबाबत सांगताना अदानी म्हणतात, ते दृश्य अतिशय भयावह होते. आम्ही रात्रभर हॉटेलमध्येच अडकून होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची सुटका झाली. पण त्या परिस्थितीतदेखील मी घाबरलो नाही, कारण घाबरुन काहीही फायदा होणार नव्हता.