चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग करून भारताने इतिहास रचला. खरे तर, भारताने जी कामगिरी केली, तशी कामगिरी जगातील इतर कोणत्याही देशाला साध्य झालेली नाही. अमेरिका, रशिया आणि चीन चंद्रावर पोहोचले खरे, पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत एकमेवाद्वितीय आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे लँडिंग केवळ अंतराळ जगतासाठीच महत्त्वाचे नाही, तर या यशाने म्हैसूरच्या एका व्यक्तीलाही अब्जाधीश बनवले आहे.
ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरला वीज पुरवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टिमचा पुरवठा करणारी कंपनी कायन्स टेक्नॉलॉजी इंडियाचे (KTI) संस्थापक रमेश कुन्हीकन्नन आहेत.
40 टक्क्यांनी वधारला शेअर -फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, म्हैसूरमधील इलेक्ट्रिकल अभियंता आणि कायन्स टेक्नॉलॉजी इंडियाचे संस्थापक रमेश कुन्हीकन्नन यांनी यशस्वी मोहिमेदरम्यान चंद्रयान-3 च्या रोव्हर आणि लँडर या दोन्हींना वीज देण्यासाठी वापरल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक प्रणालींचा पुरवठा केला होता. चंद्रयान-3 च्या यशानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जमध्ये त्यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 3 पट वृद्धी दिसून आली आहे. त्यांच्या कंपनीचा शेअर आता 40 टक्क्यांनी वधारला आहे. या कंपनीत कुन्हीकन्नन यांचा 64 टक्के वाटा आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज डॉलर झाली आहे. ही कंपनी सर्किट बोर्ड्सचे उत्पादन आणि असेंबलिंगचे काम करते.
पुढील वर्षात आणखी मालामाल होईल कंपनी - केटीआय निर्मित सर्किट बोर्डांचा वापर ऑटोमोटिव्ह, एयरोस्पेस, वैद्यकीय, तसेच संरक्षण आदि क्षेत्रांमध्ये केला जातो. 1988 मध्ये कुन्हिकन्नन यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. केटीआयने इलेक्ट्रॉनिक्सचे कंत्राटी उत्पादक म्हणून सुरुवात केली. 1996 मध्ये रमेश आणि त्यांची पत्नी सविता यांनी याचा आणखी विकास केला. फोर्ब्सने केटीआय कंपनीच्या वाढीसंदर्भात एक अहवाल दिला असून कंपनीला 2024 पर्यंत 208 मिलियन डॉलरचा वार्षिक महसूल प्राप्त होईल अशी शक्यता वर्तवली आहे.