नवी दिल्ली : दिवाळीत तोंड गोड करण्यासाठी पाहुणे तसेच मित्र परिवारात मिठाईचे वाटप मोठ्या प्रमाणावर केले जाते. हल्ली याच्या जोडीला चॉकलेटही वाटण्याचा ट्रेंड वाढताना दिसतो. त्यामुळेच बाजारात नाना प्रकारची आणि अनेक फ्लेवर्सची चॉकलेट मिळत असतात. दिवाळीपासून चॉकलेटला वाढू लागलेली मागणी नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत कायम असते. परंतु, यंदा चॉकेलटची आवड खिशाला चाट लावणारी ठरणार आहे. कारण याचे दर गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी पोहोचले आहेत. हवामानाच्या बिकट स्थितीमुळे कोकोच्या उत्पादनाला फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव चांगलेच वाढले आहेत. या दोन्हींच्या किमती वाढल्याने चॉकलेटच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. (वृत्तसंस्था)
‘अल् निनो’मुळे पिकाला फटका सध्या कोकोच्या दरांनी बाजारात गेल्या ४५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मागच्या एका वर्षात कोकोच्या किमती ६५ टक्क्यांनी कडाडल्या आहेत. कोकोच्या किमती वाढल्याने मागणीवरही परिणाम झाला आहे. चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कोकोच्या मागणीत १८ टक्क्यांनी घट झाली आहे.‘अल् निनो’मुळे पश्चिम आफ्रिकेतील कोको उत्पादनाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कीड लागल्याने उत्पादन फेकून द्यावे लागले आहे.याच कारणांमुळे सर्वात मोठे उत्पादक आयवरी कोस्ट आणि घानामधील कोको उत्पादन घटून ५६ हजार टनांवर आले आहे. मागच्या वर्षी हेच उत्पादन ९१ हजार टन इतके होते.
साखरेच्या पुरवठ्यावर जगभरात ताणभारतात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन तसेच जगभरात निर्यातही केली जाते. परंतु, यंदा साखरेचे उत्पादन घटल्याने स्थानिक बाजारातील पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भारताने साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. पुरेशा पुरवठ्याअभावी जगभर साखरेच्या मागणीवर तणाव असेल.