नवी दिल्ली :
फोर्ब्सच्या नोव्हेंबरच्या अंकात जारी करण्यात आलेल्या २० आशियाई उद्योजक महिलांच्या यादीत ३ भारतीय महिलांचा समावेश करणयात आला आहे. सोमा मंडल, नमिता थापर आणि गझल अलघ उद्योजिकांना स्थान मिळाले आहे.
फोर्ब्सच्या या यादीत अशा महिलांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी कोविड-१९ साथीच्या अनिश्चिततेच्या काळातही आपला व्यवसाय वाढविण्यात लक्षणीय यश मिळविले. लाॅकडाउनमुळे या काळात बहुतांश कंपन्यांचा व्यवसाय ठप्प पडला हाेता. या यादीतील सोमा मंडल या स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (सेल) चेअरपर्सन आहेत. नमिता थापर या एमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालक, तर गझल अलघ या होनासा कंझुमरच्या सहसंस्थापक तथा मुख्य नवोन्मेष अधिकारी (चीफ इनोवेशन ऑफिसर) आहेत. या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या काही महिला शिपिंग, रियल इस्टेट आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रात काम करतात.
सोमा मंडल
यांनी जानेवारी २०२१ मध्ये सेलचे चेअरपर्सनपद स्वीकारले. या पदावर बसलेली पहिली महिला होण्याचा मान त्यांना मिळाला. त्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. नालकोमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली हाेती.
नमिता थापर
एमक्योर फार्मास्यूटिकल्सच्या सीईओ असलेल्या नमिता यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. पुण्यात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. आयसीएआयमधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी घेतल्यानंतर त्या अमेरिकेला गेल्या. व्यावसायिक अनुभव घेऊन त्या भारतात परतल्या. नमिता यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपये आहे.
गझल अलघ
हरियाणातील गुरुग्राममध्ये जन्मलेल्या गझल अलघ यांनी पंजाब विद्यापीठात पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. २०१६ मध्ये त्यांनी पती वरुण अलघ यांच्यासोबत होनासा कंझुमर प्रायवेट लिमिटेडची स्थापना केली. हा एक टॉक्सिन-फ्री ब्रँड असून सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या एफएमसीजी ब्रँड्समध्ये त्याचा समावेश आहे.
या क्षेत्रांमध्ये आहे माेठे याेगदान
माहिती तंत्रज्ञान, औषधी इत्यादी क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञानावर काही जणी काम करीत आहेत. तर काही जणी नाविन्यपूर्ण क्षेत्रांच्या विकासात याेगदान देत आहेत. यादीत ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, तैवान आणि थायलंड या देशांतील महिलांचा समावेश आहे.