मुंबई - दिवाळीत दरवर्षी नव्या वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, यंदा मुंबईमध्येवाहन खरेदीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. सन २०२३च्या दिवाळीमध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडव्यादरम्यान मुंबई आणि उपनगरीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) एकूण २,७०२ दुचाकी आणि १,२८९ कार गाड्यांची नोंदणी झाली होती. मात्र, यावर्षी हा आकडा लक्षणीयरीत्या कमी झाला. १,८५१ दुचाकी आणि ५४० कार गाड्यांची नोंदणी झाली आहे. वाहनांच्या नोंदणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्क्यांनी घट झाली आहे.
जगभरातील वाढती महागाई आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे लोकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. याचाच परिणाम म्हणजे दिवाळीसारख्या मोठ्या सणातही वाहन खरेदीत एवढी मोठी घट झाली आहे. दिवाळीच्या दिवशी नव्या वाहनांची खरेदी आणि नोंदणी हे सकारात्मक संकेत मानले जात असले तरी यंदाच्या घसरणीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळात त्याचा विपरीत परिणाम या उद्योगावर होण्याची भीती ऑटोमोबाइल उद्योगाशी संबंधित जाणकारांनी व्यक्त केली आहे.